Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बहुतांश आमदार पदवीअभावी मतदानापासून वंचित

पद मिळाले, पदवी विसरले


चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश आमदार पदवीअभावी मतदानापासून वंचित


चंद्रपूर:- बोचऱ्या थंडीत नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा समोरासमोर आले आहे. परंतु उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारेच जिल्ह्यातील बहुतेक विद्यमान आमदार, खासदार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाही. त्यांनी राजकीय जीवनात पद मिळवले. परंतु शैक्षणिक पदवीअभावी निवडणुकीत ते केवळ प्रचारप्रमुख आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात माजी अर्थमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडेच पद आणि पदवी आहे. या दोघांची मतदार म्हणून नोंदणी आहे.

नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांचा नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात समावेश आहे. जवळपास दोन लाख दहा हजार पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी आहे. नागपूरनंतर सर्वाधिक सुमारे ३८ हजार मतदार चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जयपराजयाचे गणित ठरविताना चंद्रपूरची भूमिका महत्त्वाची राहील. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने या जिल्ह्यातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले.

           चंद्रपूर जिल्हात महाविकास आघाडीची धुरा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आहे. परंतु यातील केवळ धोटेच मतदानासाठी पात्र आहेत. निवडणूक आयोगाकडील शपथपत्रानुसार जिल्ह्यातील बहुतांश आमदार पदवी प्राप्त नसल्याचे दिसून येते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार दहावा वर्ग उत्तीर्ण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वसंत विद्यालयातून वडेट्टीवार १ ९७८-७९ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले . खासदार धानोरकर यांनी सुद्धा बीए प्रथम वर्षांनंतर शिक्षणाला जय महाराष्ट्र केला. सोबतच त्यांनी औषधशास्त्र पदविकेची प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे. 
                 
             आमदार प्रतिभा धानोरकर बीए प्रथम वर्षाच्या पुढे जाऊ शकल्या नाही. चिमूरचे भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांनी सन २०१४ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दहावी अनुत्तीर्ण असल्याचे सांगितले होते. १९९७ मध्ये भांगडिया चिमूर येथील नेहरू विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी होते. परंतु ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवास सुरू केला. त्यांनी वर्षभरापूर्वीच वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली. सन २०१९ मधील शपथपत्रात ते वाणिज्य शाखेचे प्रथम वर्षाची परीक्षा दिल्याचा उल्लेख आहे.
             
            चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवारसुद्धा दहावीच्या पुढे जाऊ शकले नाही. ते उत्तीर्ण झाले. परंतु पुढच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला नाही. आता याच लोकप्रतिनिधींवर पदवीधर मतदारसंघातील स्वपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी मतदानासाठी (नोंदणी केलेला) पात्र असतो. परंतु प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या बहुतेकांकडे पदवी नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार, असे चित्र बघायला मिळत आहे.


जोशी बीकॉम, वंजारी एलएलबी.......

भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर महाविकास आघाडीने अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरविले. जोशी बी-कॉम, तर वंजारी यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे . वऱ्हाडी भाषेत शिकविणारे यू-ट्यूब स्टार नीलेश कराळे यांचीही उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे. कराळे बीएस्सी, बीएड आहेत.मुनगंटीवार, धोटे पदवीधर मतदानासाठी पात्र.......

 भाजपचे आमदार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आजच्या घडीला जिल्ह्यातील सर्वाधिक शिक्षित लोकप्रतिनिधी आहे. मुनगंटीवार यांच्याकडे अनेक पदव्या आहे. त्यांनी बी-कॉम, एम-कॉम, डीबीएम, कायद्याची पदवी, पत्रकारितेच्या पदवीसोबतच एम-फिल पूर्ण केले आहे. काँग्रेसचे राज्याचे आमदार सुभाष धोटे कला शाखेतील पदवीधर आहे. या दोघांनीही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि भाजपचे लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी जिवाचे रान करतील. परंतु मतदान मात्र हे दोघेच देऊ शकतील.


ना. वडेट्टीवार, खा. धानोरकर, आ. भांगडीया, आ. जोरगेवार, आ. धानोरकर पदवीधर मतदानासाठी अपात्र......

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं शिक्षण दहावी पर्यंत, खासदार धानोरकर हे बीए प्रथमवर्षं, आमदार धानोरकर बीए प्रथमवर्ष, आमदार भांगडीया मुक्त विद्यापीठ प्रथमवर्ष, आमदार जोरगेवार दहावीच्या पुढे जाऊ शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies