शेतमजुरांची हत्या करून अर्धनग्न अवस्थेत टाकला मृतदेह





चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात



वरोरा : वरोरा तालुक्यातील बारव्हा येथील एका शेतमजुरांची हत्या करून अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह नाल्याच्या किनाऱ्यावर टाकल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. गुरुवारी सदर गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपींसह चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. अवघ्या २४ तासात घटनेचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांनी यश मिळविले. परंतु हत्येचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने हत्येबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.


वरोरा तालुक्यातील बारव्हा येथील दिलीप कारेकार या शेतमालकाकडे ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील टिकाराम मारोती चौधरी (५०) हा गेल्या १५ वर्षांपासून मजूर म्हणून कामावर होता. तो बारव्हा येथेच राहत होता. १८ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह बारव्हा ते खांबाडा मार्गावरील एका नाल्याच्या किनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किट, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतकाचे शरीरावर मारहाणीच्या खुणा पोलिसांना आढळून आल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. तसेच संजय घनश्याम वाघ रा. बारव्हा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भांदवीचे कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला.





यानंतर पोलीस अधिकार्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या चोवीस तासात गुन्ह्यातील चार आरोपींना शोधून दोघांना गजाआड करण्यात यश मिळवले. मनोज उर्फ चंद्रकांत प्रभाकर देठे (२५) आणि राजू उर्फ राजा सुनील देठे (२४) दोघेही राहणार खांबाडा हे अटकेतील दोन आरोपी असून अन्य दोन आरोपी अल्पवयीन आहे. आरोपींना अटक करण्यात आली असली तरी हत्येचे नेमके कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने हत्येबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. आवश्यक त्या सर्व दिशेने पोलीस तपास करीत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आणखी काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे करीत आहे.

Post a comment

0 Comments