Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

हिरव्या मनाचा लोकनेता म्हणतो , भावनेतून गणिताकडे जात आहे राजकारण


सुधीर मुनगंटीवार. बस नाम ही काफी है, असं त्यांच्याबाबतीत म्हटलं जातं. सुधीरभाऊ म्हणजे सरधोपट राजकारण करणारे राजकारणी नाहीत, तर मानवतावादी दृष्टिकोण ठेवून जनतेसाठी कार्य करणारे लोकप्रिय नेते आहेत. आजची राजकीय स्थिती बघून व्यतिथ झालेला हा लोकनेता म्हणतो, 'आजचे राजकारण भावनेतून गणिताकडे जात आहे. मी १९८९ मध्ये पहिली निवडणूक लोकसभेची लढलो, तेव्हा आणि आत्ताच्या राजकारणात 'जमीन अस्मान'चा फरक आहे.' केवळ निवडणुकीत लोकांची मतं जिंकण्यासाठी नव्हे, तर त्यांची मने जिंकण्यासाठी सतत कार्यरत राहणारा हिरव्या मनाचा लोकनेता म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार...
१९८९ ची पहिली निवडणूक
सन १९८९ मध्ये चंद्रपुरात सुधीरभाऊंनी प्रथम श्रेणीत एम. कॉम केल्यानंतर ते एम.फील चे विद्यार्थी होते. शिक्षण पूर्ण करून प्राध्यापकाची नोकरी करायचा त्यांचा मानस होता.पण त्यांच्यासाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर तेव्हाही ते काम करतच होते. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष ॲड. दादा देशकर याच्यासोबत ते सिंदेवाही आणि तळोधी बाळापूरला गेले होते. परतीच्या प्रवासात मुसळधार पाऊस झाला आणि येताना त्यांना चार तास नदीच्या पुराने रोखले. तेव्हा देशकर त्यांना म्हणाले, 'मी ८४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढलो होतो. ५८ हजार मते मिळाली होती. आता नाही लढणार, त्यामुळे सुधीर तू आता लढले पाहिजे.' सुधीरभाऊंनी ही गोष्ट तेवढी गांभीर्याने घेतली नाही. पण मतदारसंघातील गांवांची नावेच तेवढी त्यांनी ऐकलेली होती. ते निवडणूक लढले, जिंकले नाही, पण पक्षाला ५८ हजारांवरून २ लाख मतांपर्यंत पोहोचवले.

शांताराम पोटदुखेंनी पण आशिर्वाद दिला ...
निवडणूक लढताना त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते केंद्रात अर्थराज्यमंत्री राहिलेले शांताराम पोटदुखे. ते सुधीरभाऊंच्या वडीलांचे मित्र आणि ज्या संस्थेत ते शिकले त्या संस्थेचे अध्यक्ष होते. निवडणुकीपूर्वी ते शांतारामजींचा आशिर्वाद घ्यायला गेले. त्या काळात महाभारत मालिकेचा प्रभाव जनमाणसांवर होता. त्यावेळी शांतारामजींनी त्यांना आशिर्वाद दिला, पण तो विजयासाठी नाही. तेव्हा ते म्हणाले माझे आशिर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत, पण आज मी तुला 'विजयी भव...', असं नाही म्हणणार.

अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली.

१९८९ प्रचार सभेसाठी अटलबिहारी वाजपेयी चंद्रपुरला आले होते. मंचावरील सर्व नेत्यांची भाषणे होता-होता बराच वेळ निघून गेला. तेवढ्यात वाजपेयींचे आगमन झाले. येताच त्यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले, पण ते म्हणाले की, 'उम्मीदवार का भाषण हुवा की नहीं?', त्यावर त्यांना नकारार्थी उत्तर मिळाले. तेव्हा ते म्हणाले, 'नहीं. पहीले उम्मीदवार का भाषण होना चाहिये. वक्त की किल्लत है, लेकीन पांच मिनट आप उम्मीदवार का भाषण किजीये.' असं म्हटल्यावर सुधीरभाऊ भाषणासाठी उभे झाले आणि केवळ साडेतीन मिनीटांत तडाखेबाज भाषण ठोकले. वाजपेयी त्यांच्या भाषणाने अत्याधिक प्रभावित झाले आणि स्वतः भाषणासाठी उभे झाले तेव्हा म्हणाले की, 'ये लडका बहुत आगे बढेगा. आगे जाकर समूचे महाराष्ट्र में भाजप का नेतृत्व करेगा.' त्यानंतर २१ वर्षांनी २ एप्रिल २०१० ला सुधारभाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली.


वाजपेयींना भेटून झाले अतिव दुःख...

२ एप्रिल २०१० ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर १० एप्रिलला ते आपल्या १०-१२ सहकाऱ्यांसह वाजपेयींना भेटायला दिल्लीला गेले. त्यांच्या प्रकृतीची कल्पना त्यांना नव्हती. त्यांचे जावई भट्टाचार्य यांनी सुधीरभाऊंना आधी एकट्यानेच भेटायला जा, असे सांगितले. जेव्हा ते वाजपेयींच्या कक्षात गेले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्याचा कक्ष दवाखान्यात रुपांतरित झाला होता. ज्या कंठात साक्षात महासरस्वती वास करीत होती, तो स्वरकंठ निकामी झाला होता आणि काढून टाकला होता. त्यांना बोलता येत नव्हतं. आपल्या हिरोची अशी अवस्था बघून सुधीरभाऊंना अतिव दुःख झाले.

शांतारामजी थांबत जेवायचे...

दिल्लीतील एक आठवण सुधीरभाऊ सांगतात ती अशी की, दिल्लीत गेले असताना मुक्कामासाठी प्रमोद महाजनांना त्यांनी कॉल केला. दरम्यान शांतारामजींना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ सुधीरभाऊंना कॉल करून दिल्लीत असताना 'तू प्रमोदजींकडे कसा जाणार, नाही जायचं, माझ्याकडे ये मुक्कामाला', असं सांगितले. त्यानंतर सुधीरभाऊंना घ्यायला गाडी पाठवली. ते पोचेपर्यंत शांतारामजी त्यांच्यासाठी जेवायचे थांबले होते. त्यानंतर ते नेहमीच सुधीरभाऊ पोचेपर्यंत जेवायला थांबत आणि मग गप्पाटप्पा करीत दोघेही जेवण करीत असत. 'मी त्यांच्या विरोधात लढलो, पण त्याकाळी कधीही वैयक्तिक टिका केली जात नव्हती आणि विरोधी पक्षातील लोकांचाही सन्मान केला जायचा. शांतारामजींनी माझे असे कौतुक करणे, जीवनातील सर्वाधिक आनंददायी क्षण होते', असे ते म्हणतात.

प्रशासकीय संतांचा सुवर्णकाळ..

मागच्या सरकारमध्ये मंत्री असताना वन विभागाचे काम करत असताना खुप चांगले अनुभव आले. त्यावेळी भेटलेले सर्व अधिकारी हे प्रशासकीय संत होते. ते सर्वजण आताही म्हणतात, की आमच्या ३३ वर्षांच्या सेवेतील ते पाच वर्ष म्हणजे सुवर्णकाळ होता. ते आजही त्यांच्या घरून फोन करतात, घरच्या सदस्यांशीही बोलणे करुन देतात. हे माझ्यासाठी सर्वाधिक आनंद देणारी गोष्ट आहे. सुधीर श्रीवास्तव, श्री जैन, श्री मदान, विकास खारगे, राजीव जलोटा हे सर्व अधिकारी अतिषय प्रामाणिक आणि खरे प्रशासकीय संत होते. यांच्यामुळे कधीही चुकीचे काम झाले नाही. माझे मंत्रीपद गेल्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांनी माझा सत्कार केला. मंत्रीपद गेल्यानंतर सत्कार वगैरे होत नाहीत, पण माझा झाला आणि त्यावेळी त्यांनी कौतुकाचे जे शब्द वापरले, ते माझ्यासाठी आयुष्यभराचा अनमोल ठेवा आहेत, असं सुधीरभाऊ म्हणतात.

सिनेमाची भारी आवड, भक्ती मंदिरात, अन् मनोरंजन थियेटरात...

सुधीरभाऊंना सिनेमा बघण्याची अगदी लहानपणापासून भारी आवड आहे. पण टिव्ही वर सिनेमा बघणे त्यांना अजिबात आवडत नाही. ते नेहमी थियेटरमध्ये जाऊनच सिनेमा बघतात. आजही कुटुंबियांसोत, मित्रमंडळींसोबत ते सिनेमे बघण्याची हौस पूर्ण करतात. त्यांचे म्हणणं आहे की, थियेटरमध्ये आपल्या डोक्यात इतर कुठलेही विचार नसतात. आपण पूर्णपणे समर्पित होऊन सिनेमाचा आनंद घेऊ शकतो. घरी तसं होत नाही. त्यामुळे थियेटरमध्ये जाऊनच सिनेमा बघण्याचा प्रयत्न असतो.

१७०० वर्षांनंतर महाराष्ट्राला मिळाला 'हा' सन्मान.

सुधीरभाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सपनाताई कुटुंबियांसह तिरूपती बालाजीच्या दर्शनाला नियमीतपणे जात असतात. कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढदिवस मंदिरात दर्शन घेऊनच साजरे केले जातात. यावर्षी कोरोनाच्या उद्रेकाने उद्भवलेल्या स्थितीमुळे प्रवासावर बंदी होती. त्यामुळे तिरूपतीला जाता आले नाही. पण सौ.सपनाताई तिरुपती बालाजी देवस्थानच्या दोन वर्ष ट्रस्टी होत्या. बालाजींवर असलेली असीम श्रद्धा आणि भक्ती यामुळेच हे पद मिळाल्याचे त्या मानतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे १००, २०० नव्हे तर तब्बल १७०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा हे पद महाराष्ट्राला सौ.सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने मिळाले. ही राज्यातील तमाम जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

शरद पवारांच्या प्रस्तावावर सही नाही केली म्हणून...

शांताराम पोटदुखे केंद्रीय अर्थराज्यमंत्री झाले, तेव्हाच्या घडामोडींबाबत सुधीरभाऊंनी सांगितले की, तेव्हा सर्व खासदारांनी शरद पवारांना पद मिळावे म्हणून त्या प्रस्तावावर सह्या केल्या होत्या. पण शांतारामजींनी त्यावर सही केली नव्हती. म्हणून त्यांना मंत्री बनवण्यात आले. त्यानंतर शांतारामजींनी सांगितले की, 'माझी सही पण त्या प्रस्तावावर झाली असती, पण मी त्यावेळी उशिरा पोहोचलो होतो आणि माझी सही होऊ शकली नाही. पण माहिती नव्हते की, त्यामुळेच मला मंत्रीपद मिळेल.'

1989 मध्‍ये चंद्रपूर लोकसभेची निवडणूक

लढविणारा एक तरूण पुढे राज्‍याच्‍या राजकीय क्षेत्रातील शिर्षस्‍थ नेता ठरेल, असे कुणालाही वाटले नसावे. विद्यार्थी दशेतुनच तयार झालेले सुधीरभाऊंचे नेतृत्‍व आज प्रचंड प्रगल्‍भ झाले आहे. अफाट जनसंपर्क, अमोघ वक्‍तृत्‍व, कुशल नेतृत्‍वगुण यांच्‍या बळावर सुधीरभाऊंनी अवघा महाराष्‍ट्र व्‍यापत स्‍वतःला सिध्‍द केले. मागिल युती सरकारमध्ये राज्‍याचे अर्थ, नियोजन, वने, विशेष सहाय्य या खात्‍यांचे मंत्री राहीलेले सुधीरभाऊ राज्‍यातील प्रमुख राजकीय नेत्‍यांपैकी एक आहेत.

विविध पदव्‍या व पदविका धारण करत उच्‍च

विद्याविभूषीत लोकप्रतिनिधी म्‍हणून सुधीरभाऊ राजकीय क्षेत्रात आले. चंद्रपूरच्‍या सरदार पटेल महाविद्यालयाच्‍या छात्रसंघाच्‍या निवडणूकीतुन खऱ्या अर्थाने त्‍यांच्‍यातील नेता उदयास आला. विद्यार्थी, तरूणांचे विविध प्रश्‍न हाताळत, त्‍यांची सोडवणूक करण्‍यासाठी संघर्ष करत, आंदोलने करत हे नेतृत्‍व विकसित होत गेले. भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षामध्‍ये विविध संघटनात्‍मक जबाबदा-यांचे यशस्‍वीपणे निर्वाहन करत हा तरूण स्‍वतःला सिध्‍द करत गेला. 1989 मध्‍ये पहिल्‍यांदा लोकसभेची निवडणूक त्‍यांनी लढविली. या निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान अटलबिहारी वाजपेयी त्‍यांच्‍या प्रचारार्थ आले होते. उमेदवार म्‍हणून सुधीरभाऊंचे भाषण ऐकल्‍यानंतर हा तरूण भविष्‍यात मोठा नेता बनेल, अशी भविष्‍यवाणी अटलजींनी केली होती, ती आज सार्थ ठरली आहे. 1989 व 1991 या दोन लोकसभेच्‍या निवडणूकीत जरी त्‍यांना अपयश आले तरीही यातुनच त्‍यांच्‍या विजयाचा मार्ग प्रशस्‍त झाला.

पराभव झाला म्‍हणून लाजायचे नाही व विजय झाला म्‍हणून माजायचे नाही...
पराभव झाला म्‍हणून लाजायचे नाही व विजय झाला म्‍हणून माजायचे नाही, या सुत्रानुसार चालणारे सुधीरभाऊ 1995 मध्‍ये पहिल्‍यांदा विधानसभेची निवडणूक लढले व 55 हजाराच्‍या वर मताधिक्‍याने, विदर्भातून सर्वाधिक मतांनी विजयी होत ते विधानसभेत पोहचले. विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत आपल्‍या अभ्‍यासू बाण्‍याने त्‍यांनी आपली छाप जनमानसावर सोडली. अनेक प्रश्‍न व समस्‍यांचा मार्ग त्‍यांच्‍यामुळे सुलभ झाला. अनेक निर्णय घेण्‍यास त्‍यांनी शासनाला भाग पाडले. राष्‍ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्‍कृष्‍ट आमदार पुरस्‍कार त्‍यांना तत्‍कालीन राज्‍यपाल डॉ. पी.सी. अलेक्‍झांडर यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. हा त्‍यांच्‍यातील लोकप्रतिनिधीचा गौरव ठरला. याच काळात त्‍यांनी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन अंध, अपंगांच्‍या क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनिय कार्याचा राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघाने गौरव करत 'लेफ्टनंट जनरल जी.एल. नर्डेकर' स्‍मृती पुरस्‍कार प्रदान केला.

दरम्‍यानच्‍या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष पद त्‍यांनी भूषविले. 1996 मध्‍ये महाराष्‍ट्र प्रदेश भाजपाचे ते सरचिटणीस झाले. 2010 मध्‍ये भाजपाचे महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्ष झाले. विविध संघटनात्‍मक जबाबदा-या यशस्‍वीपणे पार पाडत, विधानसभेच्‍या माध्‍यमातुन जनसामान्‍यांचा आवाज बुलंद करत ते थेट राज्‍यातील जनतेच्‍या मनात शिरले व राज्‍यभर लोकप्रिय ठरले. 1999, 2004 मध्‍ये चंद्रपूर विधानसभेतून ते पुन्‍हा निवडून आले. 2009 मध्‍ये मतदार संघ पुनर्रचनेमुळे त्‍यांना शेजारच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढवावी लागली. 2009 आणि 2014 या दोन निवडणूकींमध्‍ये पुन्‍हा प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले. गेली 25 वर्षे राज्‍याच्‍या विधानसभेत अभ्‍यासू व प्रभावी आमदार म्‍हणून ते कार्यरत आहे.

1999 मध्‍ये सहा ते सात महिन्‍यांसाठी राज्‍याचे पर्यटन मंत्री म्‍हणून त्‍यांच्‍यावर जबाबदारी सोपविली गेली. या अल्‍पावधीत राज्‍याच्‍या पर्यटन विकासाला चालना देत त्‍यांनी आपल्‍या कर्तृत्‍वाची छाप सोडली. पहिल्‍याच टर्ममध्‍ये थेट कॅबिनेट मंत्री पद देत पक्ष नेतृत्‍वाने त्‍यांच्‍यावर दाखविलेला विश्‍वास त्‍यांनी सार्थ ठरविला. भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांची कारकिर्द लक्षणीय ठरली. कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्‍या सरकारच्‍या कारभारावर आसूड ओढत अनेक मोर्चे त्‍यांच्‍या नेतृत्‍वात निघाले. महाराष्‍ट्रभर संघटन बांधणीसाठी त्‍यांनी दौरे करत महाराष्‍ट्र पिंजून काढला व संघटनकुशल प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून तयांनी आपली छाप सोडली.

2014 मध्‍ये राज्‍यात सत्‍तांतर झाले. भाजपाच्‍या नेतृत्‍वात सरकार स्‍थापन झाले. अर्थ, नियोजन, वने या प्रमुख विभागांची जबाबदारी मंत्री म्‍हणून त्‍यांच्‍यावर आली. त्यानंतर विशेष सहाय्य विभागाचा कार्यभार त्‍यांना सोपविण्‍यात आला. मंत्री म्‍हणून सुधीरभाऊंची कारकिर्द लक्षणीय ठरली. अर्थमंत्री म्‍हणून राज्‍याच्‍या आर्थिक विकासात बहुमोल योगदान त्‍यांनी दिले. वनमंत्री म्‍हणून हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबवित अवघा महाराष्ट्र हिरवागार करण्‍यासाठी त्‍यांनी तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. ही मोहीम विक्रमी ठरली. लिम्‍का बुक ऑफ रेकार्डने या मोहीमेची नोंद घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप देत 'मन की बात' मधून या मोहीमेचे कौतुक केले. महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्‍या प्रतिष्‍ठीत समूहाने दोन वेळा त्‍यांचा गौरव केला. आफ्टरनुन वाईस या समूहातर्फे 'बेस्‍ट परफॉर्मींग मिनीस्‍टर' या पुरस्‍काराने त्‍यांचा गौरव झाला. जेसीआय महाराष्‍ट्र ने 'मॅन ऑफ द इयर', लोकमत समूहाने 'महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर', लोकसेवा आणि विकास संस्‍थेने कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सन्‍मान, फेम इंडियाने देशातील सर्वश्रेष्‍ठ अनुभवी मंत्री असे विविध प्रतिष्‍ठेचे पुरस्‍कार सुधीरभाऊंना बहाल करण्‍यात आले व त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाचा गौरव करण्‍यात आला.

सुधीरभाऊंनी अर्थमंत्री म्‍हणून मांडलेले पाचही अर्थसंकल्‍प त्यांची विकासासंबंधीची व अर्थकारणासंबंधीची दुरदृष्‍टी दर्शविणारे ठरले. त्या पाच वर्षांत त्‍यांच्‍या विभागांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांनी घेतलेले अनेक लोककल्‍याणकारी निर्णय शासन आणि सर्वसामान्‍य जनता यांच्‍यातील नाते दृढ करणारे ठरले. चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री म्‍हणून त्‍यांची कामगिरी तर अफाट आहे. देशातील अत्‍याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, वनअकादमी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, क्रिडा संकुले, इको पार्क अशी विविध विकासकामांची मोठी मालिकाच त्‍यांनी पालकमंत्री म्‍हणून जिल्‍हयात तयार केली. मिशन शौर्य, मिशन सेवा, मिशन शक्‍ती अशा नाविन्‍यपूर्ण उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन या जिल्‍हयाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करण्‍याचा प्रयत्‍न सुधीरभाऊंनी सातत्‍याने केला आहे.

पक्षाचे पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो वा सर्वसामान्‍य जनता प्रत्‍येकाला आपला हक्‍काचा, जिव्‍हाळयाचा वाटावा, असा हा लोकोत्‍तर नेता आहे. त्‍यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रवास मोजक्‍या शब्‍दात मांडणे कठीण आहे. अजातशत्रु हे विशेषण त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाला साजेसे आहे. संघटन बांधणी, विकासकामांचा झंझावात, सेवाभावी उपक्रम, लोककल्‍याणकारी निर्णय, जनसामान्‍यांच्‍या सुखदुःखात समरस होण्‍याची वृत्ती, अशा विविध कंगो-यांनी त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व बहुआयामी व समृध्‍द झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies