खासगी कोळसा खाण कामगारांची पदयात्रा
चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज येथील खासगी कोळसा खाण कामगारांनी आज न्याय्य मागण्यांसाठी पदयात्रा काढली. सुमारे साडेचारशे पीडित कामगार असून, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्धार केला. मात्र वाटेतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात बरांज इथं कर्नाटक-एम्प्टा नावाची कोळसा खाण दहा वर्षांपूर्वी सुरू झाली. यासाठी बरांजवासीयांनी नोकरीच्या आशेने आपली जमीन प्रकल्पाला दिली. चार वर्षे खाण सुरू होती. मात्र कोळसा घोटाळा समोर आल्यावर ही खाण 2015 मध्ये बंद पडली. त्यामुळं इथं काम करणारे साडेचारशेवर स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार झाले.स्थायी नोकरीची हमी देऊन या स्थानिकांना अस्थायी ठेवण्यात आलं. गेल्या पाच वर्षांपासून त्यांना कुठलंही वेतन नाही. हातची जमीन गेली. गावाचं पुनर्वसनही केलं गेलं नाही. या स्थानिकांसोबत ही फसवणूक झालेली असतानाही लोकप्रतिनिधी किंवा शासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं हे प्रकल्पग्रस्त आपल्यापरीनं वेळोवेळी आंदोलन करीत आले. पण यश काही मिळत नाही. शेवटी आज त्यांनी भद्रावती ते चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढली. मात्र अर्ध्या वाटेतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पग्रस्तांची व्यथा ऐकणारा कुणीही नाही. त्यामुळं कोळसा कंपनीनं फसवल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली असून, हा संतोष येत्या काळात अधिक तीव्रतेने पुढे येण्याची शक्यता आहे.

Post a comment

0 Comments