अनिरुद्ध वनकर हे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील विदर्भातील मोठं नाव आहे. सोबतच ते गीतकार आणि संगीतकारही आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळतेय. वनकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमएफए आणि एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.मुंबई विद्यापीठातून लोककला अकादमीचा डिप्लोमा आणि रामटेक संस्कृत विद्यापीठातून नाट्यकलेचा डिल्पोमा केला आहे. गायक कलावंत म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत राज्यभर त्यांनी गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत. याशिवाय छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्येही त्यांनी भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते झाडीपट्टी रंगभूमीशी जुळलेले आहेत.
वनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'घायल पाखरा'चे १०० पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. याशिवाय धम्माच्या वाटेवर, सुंदर माझे घर, अंधारवाट, वादळाची सावली, रमाई, स्मशान पेटला आहे, आदी कलाकृती गाजल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात त्यांनी भूमिका केलेली आहे आणि गीतकार, संगीतकार म्हणून काम केले आहे. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर कुलस्वामिनी, झी मराठीवर रंग माझा वेगळा आणि सह्यांद्री वाहिनीवर तिसरा डोळा आणि अग्निपरीक्षा या मालिकांमध्ये काम केले आहे. कलेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे.