सकीना अन्सारी रहेमतनगर प्रभागाच्या नगरसेविका आहे. त्यांचे पती रशीद अहमद अन्सारी(58)यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली. त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यानच्या काळात अन्सारी कुटुंबीयांनी शहरातील खासगी कोविड रुग्णालयात बेडचा शोध सुरू केला.परंतु, खासगी कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हता. या काळात रशीद अन्सारी यांची ऑक्सिजन पातळी आणखी कमी झाली. त्यामुळे अन्सारी कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाकडे व्हेंटिलेटर लावण्याची मागणी केली. मात्र, व्हेंटिलेटरच उपलब्ध नव्हते. प्रकृती आणखी खालावली आणि त्यातच त्यांचा काल गुरवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला.
सध्या चंद्रपुरात कोरोना झपाट्याने पसरतोय. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यात आरोग्य यंत्रणा कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज्यातील सत्तारूढ पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीला व्हेंटिलेटर मिळाले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. आता नगरसेविकेच्या पतीचे असे हाल झाले तर सर्वसामान्य जनतेचा विचारच न केलेला बरा.