आढावा बैठकीत पत्राद्वारे पालकमंत्री यांना मागणी
दिवसागणिक जिल्ह्यातील कोरोना बधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यावर प्रतिबंध म्हणून जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. मात्र हा तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय आहे. रुग्णांची वाढ आणि त्यांचे उपचारा दरम्यान होत असलेली गैरसोय लक्षात घेता विशेष उपाययोजना राबविण्यात याव्या अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे आढावा बैठक पार पडली. कोरोनावर उपचार सुरू असल्याने आमदार किशोर जोरगेवार बैठकीला उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी पत्राद्वारे या बैठकीत आपल्या मागण्या मांडल्यात हे विशेष.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडत असल्याचे लक्षात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज नियोजन भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मागण्यांचे पत्र पाठवुन आपले मुद्दे मांडलेत,
महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मोफत उपचार करण्यात यावा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत शहरातील कोविड रुग्णालये सामावून घेण्यात यावे, कोरोना संशयीत रुग्णांची तात्काळ चाचणी करून त्यांचा अहवाल ताबडतोब देण्यात यावा, कोरोना तपासणी केलेल्या रुग्णांचा अहवाल २४ तासात देण्यात यावा व त्याची रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करण्यात यावी, कोविड रुग्णालयात डॉक्टरांच्या संख्येत तात्काळ वाढ करण्यात यावी, वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता २४ तास कोरोना चाचणी केंद्र सुरु ठेवण्यात यावे, रुग्णवाहिकेच्या संख्येत वाढ करण्यात यावी, कोरोना संक्रमित रुग्णाला खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायचा असेल तर त्याला उपचार घेण्याकरिता तात्काळ परवानगी देण्यात यावी, रुग्णांच्या महत्त्वाच्या तपासणी अहवाल लवकर देण्यात यावा, कोरोना रुग्णाच्या प्रकृती बाबत रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्णाबद्दलची माहिती देण्याकरिता माहिती केद्र उपलब्ध करून देण्यात यावे, जिल्ह्यातील प्रत्येक कोरोना सेंटरवर सेंटर प्रमुखांची नियुक्ती करण्यात यावी अशा विविध मागण्या पत्राच्या माध्यमातून आढावा बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.