मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले मादक पदार्थांच्या आहारी!Children from middle class familiesDrug Diet!चंद्रपूर : शहरातील मुले गांजा व व्हाईटनरच्या आहारी गेली आहेत. नशेत त्यांच्या हातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांसह तरुणाई मादक पदार्थाच्या विळख्यात सापडली. नशा केल्यानंतर आपण काय करतोय, याची शुद्ध राहत नसल्याने मध्यमवर्गीय व सुखवस्तू कुटुंबातील मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. मादक पदार्थांची विक्री होत असताना कारवाई होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब मानली जाते.

दारू, ताडी, गांजा, चरस, भांग, अफू, गुंगी आणणारी औषधे, कफ सिरप्स, व्हाईटनरचे थिनर आदी मादक पदार्थांच्या यादीत अनेक नवीन द्रव्यांची भर पडत चालली आहे. हे पदार्थ सेवनाच्या पद्धती वेगळ्या आहेत.

यातील काही पदार्थ सिगरेटमध्ये भरून त्याचा धूर सोडला जातो. काही पदार्थ इंजेक्‍शन्सद्वारे शिरेत टोचून घेतले जातात, काही तोंडावाटे, तर काही नाकाद्वारे हुंगले जातात. या सर्व पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर, शरीरावर, आर्थिक स्थितीसह कुटुंबावर होतात.

अडीच महिन्यापासून अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. मादक पदार्थप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच अडकली आहे. मादक पदार्थाची साखळी मेट्रो सिटीच नाही तर, ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. कमी वेळात आणि श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने अनेकांनी या व्यवसायात आपले बस्तान मांडले आहे.

आजची तरुणाई मादक पदार्थाच्या विळख्यात चांगलीच अडकली आहे. १६ ते २२ वर्षे वयोगटातील मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अल्पवयीन मुले वाईट मित्रांच्या संगतीमुळे मादक पदार्थाचे सेवन करीत आहेत. मित्रांचा दबाव व तणाव या पदार्थांबाबत असलेले कुतूहल, नैराश्‍यामुळे व्यसन करण्यास सुरुवात होते.

शहरातील मुले गांजा व व्हाईटनरच्या आहारी गेले आहे. नशेत त्यांच्या हातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. गांजा, दारू शहरात सहज उपलब्ध होते. मोकळ्या मैदानात बसून ही मुले धूर सोडतात. गेल्या वर्षी पोलिसांनी गांजा पिणाऱ्यांविरुद्घ कारवाईची मोहीम उघडली. मात्र, काही दिवसांतच ही मोहीम गुंडाळली गेली. विक्रेत्यांपर्यंत पोलिसांचे हात नेहमीप्रमाणे पोहोचू शकले नाही. परिणामी व्यसनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. सध्या कोरोनाविरुद्घच्या लढाईत प्रशासन गुंतले आहे. याचाच फायदा मादक पदार्थ विक्रेते घेत आहेत. या व्यसनातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी विक्रेत्यांच्या मुसक्‍या आवळणे गरजेचे आहे.

करिअरची लागते वाट
कमी वयाच्या मुलांत व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. मुले जाहिराती बघतात. चित्रपटातील हिरोंना आदर्श समजतात. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. मित्रांच्या संगतीमुळे मुले व्यसनाची चव चाखतात आणि मग कोणताही विचार न करता कृत्य करतात. वागण्यात फरक पडतो. गुन्हेगारी, आत्महत्या, नातेसंबंध बिघडतात, करिअरचीही वाट लागते. कोरोना काळात व्यसनात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते.

जाणून घ्या कारणे
अनेक जण तणावमुक्ती, चांगली झोप, दु:ख विसरणे यासाठी मादक पदार्थाचा आधार घेतात. खूप शक्तिशाली आहोत, समस्या सोडवू शकतो. आत्मविश्‍वास वाढतो, अशा गैरसमजुतीमुळे व्यसनाला जवळ केले जाते.

शरीरावर होणारे दुष्परीणाम
सिगारेट ओढणे, दारू पिणे, गांजा ओढणे, व्हाईटनरची नशा, खर्रा, तंबाखू आदीमुळे दात, घसा, फुफ्फुस, ह्रदय, जठर, मूत्रपिंड, पंचनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतो. कर्करोगाच्या रुग्णांत अलीकडच्या काळात वाढ होत आहे.

Post a comment

0 Comments