चंद्रपूर : कोंबडी चोरीच्या तक्रारीवर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. न्यायालयात सादर करण्यापूर्वी आरोपींची कोरोनाची चाचणी करावी लागते. यात एक आरोपी पॉझिटिव्ह निघाला आणि पोलिसांची झोपच उडाली. या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना त्वरित घरी पाठविल्या गेले असून अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर संपूर्ण पोलीस स्टेशनच कोरोन्टीन झाले आहे. चोराला पकडून स्वतः कैदी असल्यागत राहण्याची पाळी येथील पोलिसांवर आली आहे. ही घटना वरोरा येथील आहे.
साधारण एक महिन्यांपूर्वी वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागरी या गावातील एका व्यक्तीच्या घरून 20 कोंबड्या चोरी गेल्या. मात्र, याची तक्रार तरी करावी कशी आणि कोणा विरोधात हा पेच फिर्यादी समोर होता. मात्र, गावात अशी गुपित फार काही काळ टिकत नाही. जवळपास एक महिन्यापासून फिर्यादी या कोंबडीचोरांचा शोधात होता. अखेर या कोंबडीचोरीची कुजबुज फिर्यादीच्या कानावर गेली. गावातील चार लोकांनी आपल्या कोंबड्या लंपास केल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार त्याने बुधवारी या चार आरोपींनी आपल्या कोंबड्या चोरल्याची तक्रार वरोरा पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी या चारही आरोपींना गावात जाऊन ताब्यात घेतले. यावेळी वाहन चालक आणि तीन कर्मचारी यासाठी गावात गेले होते. या आरोपींना ठाण्यात आणून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. आरोपींना न्यायालयात सादर करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करावी लागते. त्यानुसार शुक्रवारी त्यांची चाचणी करण्यात आली. आणि पोलिसांना जबर धक्का बसला. कारण त्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. ह्या आरोपीची रवानगी कोठडीत करण्याऐवजी त्याला कोव्हीड केंद्रात दाखल करण्याची वेळ या घटनेमुळे आली.
इतर आरोपी निगेटिव्ह आले असले तरी त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची झोप उडाली. आरोग्य विभागाला पाचारण करून संपूर्ण पोलीस ठाणे सॅनिटाइझ करण्यात आले. जे संपर्कात आले त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने आयसोलट करण्यात आले असून पुढील तीन दिवस त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांची तीन दिवसांनी चाचणी करण्यात येणार आहे. आता पोलिस ठाण्यात येणाऱ्या आगंतुकांना येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ज्यांची तक्रार असेल त्या एकाच व्यक्तीने पोलीस ठाण्यात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक तक्रारदार आरडाओरडा करून मोठमोठ्या आवाजात आपले गाऱ्हाणे मांडत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे शिक्षित व्यक्तीकडून आपली तक्रार लिहून आणावी अशा सूचना देण्यात आल्या आहे. कोंबडीचोरी प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीमुळे स्वतः पोलीस ठाण्यावरच कोरोन्टीन होण्याची वेळ आली आहे. याबाबत वरोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ह्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.