शासनाच्या वतीने घरकुलाची प्रपत्र ड मध्ये संभावित घरकूल लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. या यादीत गावातील अनेकांची नावे समाविष्ट झाली आहेत. या यादीत नाव असल्याने आपल्याला घरकुलाचा लाभ मिळणारच आहे. असे नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. नेमक्या याच वातावरणाचा काहीजण गैरफायदा उचलत असून प्रपत्र ड मध्ये नाव असलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन तुम्हाला घरकूल मंजूर झाले असल्याचे सांगत आहेत.
मी पंचायत समितीमधून आलो आहे. तुमचे घरकूल मंजूर आहे. तुमच्या घरकूलासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यासाठी काही रकमेची गरज आहे. एवढेच नाही तर मी पूर्वीअमूक अमूक पंचायत समितीत कार्यरत होतो. माझी नुकतीच नागभीड पंचायत समितीत माझी बदली झाली आहे, असे सांगून विश्वास संपादन करीत आहे.सदर व्यक्ती या लोकांना एक मोबाईल नंबरही देत आहे. या भूलथापीला काही व्यक्ती बळीसुद्धा पडल्याचे माहिती समोर आली आहे. सतर्क राहण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या असून काही ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागावर अशा लोकांपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
ग्रामसेवकांना केले सतर्क
तालुक्यातील मांगरूड ग्रामपंचायतीतंर्गत हुमा (खडकी) आणि पळसगाव ग्रामपंचायतीतंर्गत सावंगी या गावात असा प्रकार घडला. मात्र सावंगी येथील एका व्यक्तीला संशय आल्याने या व्यक्तीने नागभीड पंचायत समितीत घरकूल योजनेचे काम पाहणाऱ्या राजू बावणे या अधिकाºयास दूरध्वनीवरून माहिती दिली. या व्यक्तींनी दिलेला मोबाईल नंबर बावणे यांना दिला. योगायोगाने याचवेळी नागभिड पंचायत समितीत ग्रामसेवकांची सभा सुरू होती. बावणे यांनी ही बाब या बैठकीत कथन केली. याबाबत नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन केले. मोबाईल नंबरची पडताळणी केली असता हा नंबर बंद असल्याचे दिसून आले.
घरकुल मिळवून देतो म्हणून तालुक्यात बोगस व्यक्ती नावे बदलून गावागावात फिरत असून पैशाची मागणी करीत आहेत. अशा व्यक्तींना कोणीही पैसे देऊन आपली फसवणूक करुन घेऊ नये. असे आढळल्यास तात्काळ ग्राम पंचायतच्या निदर्शनास आणून द्यावे. यासंदर्भात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- प्रणाली खोचरे
गटविकास अधिकारी, नागभीड
0 Comments