पुराने उद्ध्वस्त झालेली शेती बघताच हादरलेल्या एका युवा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न



गोंडपिपरी :- गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला महापूर आला. पुराने गोंडपिपरी तालुक्यातील नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. पुराने उद्ध्वस्त झालेली शेती बघताच हादरलेल्या एका युवा शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल गोंडपिपरी तालुक्यातील भनारहेटी गावात घडली.





जखमी अवस्थेत शेतक-याला रुग्णालयात भरती करण्यात आले असून, चंद्रपुरात त्याच्यावर उपचार सुरू आहे.




भनारहेटी येथील केशव खामनकर याची वैनगंगा नदीकाठावर दहा एकर शेती आहे. वैनगंगा नदीला आलेल्या महापूराने खामनकर यांची दहा एकर शेती पूर्णत पाण्याखाली आली. दरम्यान सकाळी शेतात गेल्यानंतर पिकांची मातीमोल झालेली अवस्था बघून तो पुर्णत हादरला. अशातच केशवने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.





कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैनगंगेला आलेल्या महापूराने गोंडपिपरी तालुक्यातील जवळपास वीस गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे पुर्णत नुकसान झाले आहे. ही गंभीर अवस्था लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

Post a comment

0 Comments