कोरोनाच्या संकटाने नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राज्यभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात गावातील भिंती गणिताच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासाने रंगवून एका युवा अभियंत्याने अनोखी शक्कल लढवली आहे.जिल्हा परिषदेने ही संकल्पना उचलून धरत हा उपक्रम जिल्हाभर राबविण्याचे ठरविले आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने कोरोना साथरोग संकटाच्या काळात नवे शैक्षणिक वर्ष जुलैच्या प्रारंभी कागदोपत्री का होईना पण सुरू केले. प्रत्यक्षात राज्यातील ग्रामीण भागातल्या सर्वच शाळा कोरोना बाधितांसाठी विलगीकरण केंद्रे म्हणून वापरण्यात आल्या. त्यामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू होणे सध्या तरी शक्य नाही. राज्यभरात शैक्षणिक सत्र सुरू झाले असताना विद्यार्थी मात्र शाळेत नाहीत, असे विचित्र दृश्य अनुभवायला मिळत आहे. याच काळात दीक्षा ॲपच्या माध्यमातून अथवा ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थी शिकत आहेत. हाच प्रयोग कल्पक रीतीने पुढे नेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी या छोट्या गावातील अक्षय वाकुडकर नामक युवा अभियंत्याने वेगळीच शक्कल लढविली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दूर जाऊ नये, यासाठी त्याने गावातील प्रमुख चौकातल्या भिंती बीजगणित व भूमिती यांच्या उदाहरणांनी रंगवून टाकल्या आहेत. गणिताची विविध समीकरणे व नफा- तोटा -वर्तुळ-त्रिज्या असे गणिताचे सर्व प्रमुख घटक आता थेट गावातील भिंतींवर नजरेस पडत आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व स्वखर्चाने व सहका-यांच्या मदतीने केले जात आहे. परिणामी शाळेत न जाणारे मात्र गल्लीबोळात विविध खेळ खेळणारे विद्यार्थी ही समीकरणे अथवा उदाहरणे पाहून सहज शिकत आहेत. या अशा गणिताच्या अभ्यासाच्या भिँती रंगवण्याचा मोठाच फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांची नाळ शिक्षणापासून तुटू नये, हे या 'मिशन मॅथेमॅटिक्स' प्रयोगाने शक्य झाले आहे. अक्षय स्वतः गावातील जि.प. शाळेतून शिकत पुढे अभियंता झालाय हे विशेष.
दरम्यान, अक्षय वाकुडकर याने ग्रामीण भागात राबविलेली ही संकल्पना जिल्हा परिषदेने तातडीने स्वीकारली आहे. जिल्हा परिषदेने आता शाळा बंद असताना विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागातल्या चौकातील प्रमुख भिंती अशाच पद्धतीने गणिताच्या माहितीने रंगविण्याचे ठरविले आहे. यामुळे अगदी खेळता-खेळता विद्यार्थ्यांच्या वाचनात व निरीक्षणात गणिताची ही प्रमुख तत्वे रुजविली- बिंबवली जाऊ शकणार आहेत. याचा मोठा फायदा प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर होईल अशी आशा अधिकाऱ्यांना आहे.
एरवी गावातल्या भिंतींवर- बसस्थानकाच्या शेडमध्ये नको त्या जाहिराती- पिचकाऱ्या अथवा चित्रपटांचे पोस्टर्स यांची गर्दी असते. मात्र आता याच भिंती गणिताच्या प्रमेयांनी बोलक्या झाल्याने गावातील विद्यार्थीदेखील अभ्यास व शिक्षणाप्रती सजग होणार आहेत. दीर्घकाळापर्यंत कामात येणारी ही शक्कल युवा अभियंत्याच्या पुढाकाराने सुरू तर झाली, मात्र त्याला व्यापक स्वरूप देण्याची जिल्हा परिषदेची धडपड अभिनंदनीय ठरली आहे.