भाटव्याने सख्या साळीचा धारदार शस्त्राने केला खून
चंद्रपूर : भद्रावती :

विहिरीचे बांधकाम करण्यासाठी साळीला उसने दिलेले दहा हजार रुपये परत न केल्याने संतप्त झालेल्या भाटव्याने सख्या साळीचा धारदार शस्त्राने खून करण्याची घटना भद्रावती शहरातील फुकटनगर वस्तीत आज दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.


संगीता प्रकाश कांबळे वय 45 वर्षे रा.बेसा ता.वणी असे मृतक महिलेचे नाव आहे. ती फुकटनगर वस्तीमध्ये स्वतःच्या घरी आपल्या पती व मुलाबाळासोबत राहत होती. तिच्याच घराच्या समोर तिचे सख्खे भाऊजी भालचंद्र रामा मून वय 60 वर्ष याचे घर आहे.

भालचंद्र रामा मून याने संगीताला विहिरीच्या बांधकामाकरिता दहा हजार रुपये उसने म्हणून दिले होते. परंतु ते पैसे तिने परत केले नाही. पैशाकरिता भालचंद्र तगादा लावतो म्हणून संगीता पती व मुला मुलीसह बेसा येथे राहायला गेली होती. दरम्यान, संगीताच्या मुलाने फायनंसवर घेतलेल्या दुचाकीचा हप्ता भरण्याकरिता ती काही दिवसांपूर्वी भद्रावती येथे आली.


ती आज दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेला कचरा फेकण्यासाठी बाजूला गेली. त्यावेळी ती शेजारच्या महिलेसोबत बोलत असताना भालचंद्र तेथे गेला व त्याने दिलेल्या पैशाची मागणी केली. तेव्हा संगीताने दोन महिन्या नंतर पैसे परत करणार असे सांगितले. त्यामुळे भालचंद्र व संगीता यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या भालचंद्रने सतूराने संगीताच्या पोटावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली.


तिला जखमी अवस्थेत तिच्या गौतम नामक मुलाने तात्काळ भद्रावती ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून संगीतास मृत घोषित केले. दरम्यान, साळीवर प्राणघातक हल्ला करून भालचंद्रने स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अटक करवून घेतली.


पोलिसांनी त्याच्या विरुध्द भा.दं.वि.302 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मस्के करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी भेट दिली असून तपास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत

Post a comment

0 Comments