महावितरण ची भरती प्रक्रीया रखडल्यामुळे बेरोजगारांमध्ये असंतोषाची लाट !
चंद्रपूर : जुलै 2019 मध्ये महावितरण कंपनी ने विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रियासाठी आयटीआय धारकांकडून अर्ज मागविले होते. ही भरती प्रक्रिया 45 दिवसामध्ये पूर्ण करण्याचे आदेश तत्कालिन उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिले होते. एक वर्षाचा कार्यकाळ उलटला असून यामुळे बेरोजगारांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे.


हाती आलेल्या वृत्तानुसार, या भरती प्रक्रीयेसाठी लाखो तरूणांनी राज्यभरात अर्ज सादर केले होते. परंतु एक वर्ष उलटून महावितरण ने ही भरती प्रक्रिया राबविली नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो आय.टी.आय. बेरोजगार युवक संतापले आहेत. मागील महिन्यात राज्याचे ऊर्जामंत्री नाम. नितीन राऊत यांनी 8 दिवसांत ही भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. महावितरण ने आदेशानुसार उपकेंद्र सहाय्यक ची यादी जाहीर केली. अद्याप ही पुढील प्रक्रिया होण्याचे काही चिन्हे दिसत नाही, यासंदर्भात मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे काही बेरोजगारांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन बेरोजगारांची थट्टा केली जात आहे.


राज्यातील लाखो आय.टी.आय. धारक विद्यार्थ्यांमध्ये यामुळे असंतोषाची लाट पसरली आहे. संतापलेल्या बेरोजगारांनी ऊर्जामंत्री यांच्या घरापुढे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जामंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा लाखो आय.टी.आय. धारक बेरोजगारांनी दिला आहे.


जागतिक स्तरावर आलेले कोरोना चे संकटामुळे आधीचं त्रस्त असलेल्या बेरोजगारांना मानसिक रित्या खचविण्याचा महावितरण चा हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा बेरोजगारांच्या उद्रेक सरकारला सहन करावा लागेल याची जबाबदारीही सरकारची राहील असा इशारा बेरोजगार आयटीआय धारकांनी दिला आहे.

Post a comment

0 Comments