प्रशासनाने पुराची पूर्वसूचना न दिल्याने भीषण स्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या सर्वाधिक पूरग्रस्त लाडज गावातून नागरिकांची सुटका करणे सुरू झाले आहे. एनडीआरएफच्या सात तुकड्यांना लाडज येथे तैनात करण्यात आले आहे. सुमारे तीन दिवसांनंतर महापुराच्या वेढ्यातून लाडजवासियांची सुटका सुरू झाली आहे. प्रशासनाने पुराची पूर्वसूचना न दिल्याने भीषण स्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अजूनही लाडज गावातील शेकडो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. बचाव यंत्रणांना लाडज गावापर्यंत पोचून नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून विसर्ग मात्र अद्यापही महत्तम आहे.
गोसेखुर्द धरणाच्या पुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये खाद्य पाकिटे टाकणार- विजय वडेट्टीवार
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खाद्य पाकिटे-पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात येणार आहेत. सुमारे १५ हुन अधिक बाधित गावांमध्ये पुराची स्थिती बिकट आहे. मांगली या गावाचा २४ तासापासून संपर्क तुटलेला आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ३०८०० वरून २६ हजार क्यूसेक्सपर्यंत विसर्ग खाली आणला. बाधित गावातील स्थिती निवळण्यास मात्र २४ तास लागणार, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.