जर आजकालच्या काळात आपण पाहिले तर आपल्या भारताचे जवळजवळ सत्तर टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या दरडोई आर्थिक उत्पन्नातही कृषी क्षेत्राचा वाटा उल्लेखनीय आहे. काळाच्या बरोबर इतर क्षेत्रात सारखे प्रगत तंत्रज्ञानही कृषिक्षेत्रात येऊ घातली आहे. हरित क्रांतीनंतर या क्षेत्रात उत्तरोत्तर आमूलाग्र बदल होत गेले. जास्तीत जास्त प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यायला सुरुवात केली व कालांतराने विक्रमी उत्पादनात वाढ झाली. त्यानंतर आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला.
सध्याच्या आपण पाहिले की, कोरोनाच्या काळात आपल्या शासनाने मोफत गहू, तांदूळ यांचे वाटप केले व अजूनही करत आहेत हे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत याचे द्योतक आहे. आता भारतात तरुण पिढी शेतीकडे एक संधी म्हणून पाहत आहे, सध्या कृषी क्षेत्राचा आधुनिक अभ्यासक्रम पुढे येऊन त्याच्यात पदवी, पदवीत्तर अशा प्रकारचे अभ्यासक्रम पुढे आले आहेत. जर युवकांनी कृषी क्षेत्राविषयी शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन जरी या क्षेत्रात पुढे आले तर कृषी क्षेत्राची प्रगती आहे त्यापेक्षा अजून उंचावेल यात शंका नाही. तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये ही या अभ्यासक्रमांना महत्त्व आहे.
करिअर संबंधी थोडे
कृषी क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांना जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर आपण बायोलॉजी विषय घेऊन बारावी उत्तीर्ण केली तर आपल्याला गुणानुक्रमाने या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. त्यात पुढील अभ्यासक्रमांचा समावेश होतो- बीएससी( कृषी), बीएससी( उद्यान), बी टेक( कृषी अभियांत्रिकी), बीएससी( कृषी जैवतंत्रज्ञान), बीबीए( कृषी), बीएससी( गृह विज्ञान), बीएससी( मत्स्य विज्ञान) आणि बीएससी( पशुसंवर्धन) या प्रकारचे पदवी अभ्यासक्रम आहेत त्यात आपण प्रवेश घेऊ शकतात.
सध्या भारतामध्ये 53 कृषी विद्यापीठ, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ व चार केंद्रीय विद्यापीठे आहेत. त्यामधून आपण अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. तसेच महाराष्ट्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली या कृषी विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमाची सोय आहे.
कृषीश्री शुभम शेटिये
बल्लारपूर