चंद्रपूर महापालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये "चौथ्या "क्रमांकाचा पुरस्कारचंद्रपूर 20 ऑगस्ट - "स्वच्छ भारत मिशन" अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण २०२० " मध्ये चंद्रपूर महापालिकेस देशातील स्वच्छ शहरांमध्ये "चौथ्या "क्रमांकाचा पुरस्कार गुरुवारी ऑनलाइन 'स्वच्छ महोत्सव २०२०' समारंभात केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी जाहीर केला. चंद्रपूर महापालिकेने आपल्या शहराचा स्वच्छता आलेख नेहमीच उंचावत नेला आहे. हीच परंपरा कायम राखत गतवर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2019' मध्ये देशातील २९ व्या क्रमांकाचे मानांकन यावर्षी उंचावत "स्वच्छ सर्वेक्षण २०२० ' मध्ये देशातील चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे.सदर पुरस्कार महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी एकात्म भावनेने केलेल्या स्वच्छताविषयक जाणीवांचा व प्रत्यक्ष स्वच्छता कार्याचा असल्याचे सांगत महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी हा राष्ट्रीय बहुमान समस्त स्वच्छताप्रेमी चंद्रपूरकर नागरिकांना समर्पित केला आहे. या स्वच्छता महोत्सवात ' स्वच्छ सर्वेक्षण २०२० " मध्ये सहभागी संपूर्ण देशभरातील ४ हजारांहून अधिक शहरांमधून चंद्रपूर शहराने देशातील' चौथ्या ' क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे. स्वच्छ सर्वक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीव्दारे महापालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करीत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता अँपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय केंद्रातून अनेक नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्ना्वलीतून चंद्रपुरातील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले होते. चंद्रपूर महापालिकेने केलेले स्वच्छताविषयक काम व त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिलेला सक्रिय सहभाग यामुळे चंद्रपूर महापालिकेस देशातील चौथ्या क्रमांकाच्या शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. "स्वच्छ सर्वेक्षण २०२० " मध्ये "माझा कचरा - माझी जबाबदारी" या भूमिकेतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे विविध उपक्रमांतून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्याप्रमाणेच लोकप्रतिनिधींचाही सक्रीय सहभाग लाभला. विविध विभांगामध्ये राबविलेल्या स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांतून तसेच चित्रकला, निबंध, वक्तृत्व, शॉर्टफिल्म्स, गणेशोत्सव, स्वच्छ सोसायटी - रुग्णालय - शाळा महाविद्यालय - हॉटेल्स अशा स्पर्धा, रॅली, स्वच्छता मोहिमा अशा विविध कार्यक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग झाले व सर्वांनी मिळून शहरात स्वच्छतेचा जागर केला.महापौर राखी कंचर्लावार - स्वच्छ सर्वेक्षण २०२० मधे चंद्रपूर शहरातील नागरिकांनी ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपल्या शहराला स्वच्छतेत उत्कृष्ट क्रमांकावर आणले त्याबद्दल नागरिकांचे आभार व अभिनंदन करते. मागील आयुक्त संजय काकडे व वर्तमान आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी जे परिश्रम घेतले, स्वछता जनजागृती करण्यात सर्व नगरसेवकांनी जी मोलाची मदत केली त्याचे हे फलित आहे. जनतेच्या सहकार्याने आज आपण हा पुरस्कार घेत आहोत. यापुढेही चंद्रपूरातील नागरिकांचे सहकार्य लाभत राहील याची आम्हाला खात्री आहे.
आयुक्त राजेश मोहीते - मागील वर्षी देशातून २९ वा क्रमांक मिळविणाऱ्या आपल्या शहराने यावर्षी देशातून ४ था क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षीही आपण स्वच्छता राखण्यात कुठेच कमी नव्हतो मात्र काही घटकात आपण मागे पडलो होतो. मात्र या वर्षी नागरिकांनी महापालिकेचे प्रयत्न जाणून व स्वच्छता ही आपली जबाबदारी समजून स्वच्छता प्रश्नांना उत्तरे दिली व शहराला महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकावर आणण्यास मदत केली आहे. याबद्दल मी चंद्र्पुर शहरातील नागरिकांचे, पदाधिकाऱ्यांचे व महापालिका अधिकारी - कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.

Post a comment

0 Comments