मुल नगर परिषदेला 5 कोटी रू. चे पारितोषीक मिळणार
हे यश मुल शहरातील नागरिकांचे – आ. सुधीर मुनगंटीवार
भारत सरकारच्या स्वच्छ महोत्सव उपक्रमांतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 मध्ये चंद्रपूर जिल्हयातील मुल नगर परिषद क्षेत्र देशात 12 व्या क्रमांकाची मानकरी ठरली असून यासाठी मुल नगर परिषदेला 5 कोटी रू. निधी पारितोषीक स्वरूपात प्राप्त होणार आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर शहरापाठोपाठ मुल शहराने सुध्दा देशातील स्वच्छ शहराचे गुणांकन प्राप्त केले आहे.
2018 मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणात मुल नगर परिषदेला राज्यात 28 वा क्रमांक प्राप्त झाला होता. यासाठी 5 कोटी रूपयांचे पारितोषीक नगर परिषदेला मिळाले. 2019 मध्ये मुल नगर परिषद देशात तिस-या क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत 15 कोटी रूपयांच्या पारितोषीकाची मानकरी ठरली. या 20 कोटी रू. रकमेपैकी 10 कोटी रू. निधी नगर परिषदेला प्राप्त झाला असून यावर्षी पुन्हा 12 व्या क्रमांकाचे गुणांकन प्राप्त झाल्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल उर्वरित 10 कोटी रू. निधी नगर परिषदेला मिळणार आहे. शिवाय यावर्षीच्या गुणांकनासाठी 5 कोटी रू. निधी पारितोषीक स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
स्वच्छतेसंदर्भातील कामगिरीसह आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल शहरात विकासकामाची मोठी मालिका सुध्दा तयार झाली आहे. या माध्यमातुन मुल शहराला देखणेपण प्राप्त झाले आहे. शहरात आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कर्मवीर मा. सा. कन्नमवार सांस्कृतीक सभागृह व स्मारक, प्रशासकीय इमारत, आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतीगृह, बस स्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना, इको पार्क, आठवडी बाजार, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, शहरातील मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, पत्रकार भवनाचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम आदी विकासकामे मंजूर झाली असून यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.
विकासकामांची उल्लेखनिय मालिका आणि स्वच्छतेसंदर्भात सातत्यपूर्ण कामगिरी या माध्यमातुन मुल नगर परिषद 2018, 2019 आणि 2020 या तिन वर्षी सलग स्वच्छ सर्व्हेक्षणात पारितोषीकांची मानकरी ठरली आहे. मुल नगर परिषदेने संपादन केलेले हे यश मुल शहरातील नागरिकांचे यश असल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मुल शहरातील जनतेने माझ्यावर केलेले प्रेम व दाखविलेला विश्वास यातुनच या शहराच्या विकासाला मी गती देवू शकलो, विविध विकासकामांच्या माध्यमातुन शहराचया सौंदर्यात भर घालु शकलो, असेही त्यांनी म्हटले आहे. मुल नगर परिषदेच्या या यशाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, तत्कालीन मुख्याधिकारी विजय सरनाईक, विद्यमान मुख्याधिकारी श्री. मेश्राम, उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांच्यासह सर्व नगरसेवक व मुल शहरातील नागरिकांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहे.