ताडोबा वाघांचे 'मॅटिर्निटी होम' असल्याचे पुन्हा एकदा सिध्द
चंद्रपूर 11 जुलै - जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेटी देणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन काळात ताडोबात एकूण १२ पाहुणे आल्याने देशात ताडोबा हे एक सर्वात उत्तम प्रजानन केंद्रांपैकी एक म्हणजे वाघांचे 'मॅटिर्निटी होम' असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे, ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी.


येथे राज्यातील सर्वाधिक वाघ आहेत. त्याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चितळ, गवे असे अनेक प्राणी आहेत. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे १९५ विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे
साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते. राज्यात ताडोबात वाघांची संख्या सर्वाधिक असून प्रकल्पात वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर आणि बफर क्षेत्रात ११५ वाघ व १५१ बिबटे असल्याचा अंदाज महाराष्ट्र वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे.

सध्या ताडोबात केवळ बफर झोन मध्ये मान्सून सफारी सुरु आहे. लॉकडाऊन काळात ताडोबातील सर्वाधिक लोकप्रिय वाघीण माया या टी-१२ वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला आहे, तर दुसरीकडे छोटी तारा या टी-७ या प्रख्यात असणाऱ्या वाघिणीने कोलारा वनपरीक्षेत्रातील जामणी भागात ३ बछड्यांना जन्म दिला आहे. त्यातच सोनम वाघिणीने चार बछड्यांसह दर्शन दिल्याने लॉकडाऊन काळात ताडोबात एकूण १२ बछडे जन्माला आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a comment

0 Comments