चंद्रपुर :- लॉक डाउन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी दिनांक 10 जुलै 2020 ला विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे "वीज बिल वापसी " आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भरमसाठ आलेले वीज बिल वीज उपविभागीय अभियंता व वीज अधिकारी कार्यालयात परत केले.
दिनांक 10 जुलैला दुपारी बारा वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी,जिवती,भद्रावती,वरोरा, मूल,सावली,पोंभुर्णा या तालुका स्थळी आणि गडचांदूर अशा अकरा ठिकाणी समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने आपले वीज बिल घेऊन गेले आणि तेथे अधिकाऱ्यांना कोरोना काळात भरमसाठ वीजबिल आल्याचे सांगून ते परत केले. या आंदोलनाचे नेतृत्व गोंडपिपरी येथे माजी आमदार ऍड.वामनराव चटप,अरुण वासलवार,व्यंकटेश मल्लेलवार, तुकेश वानोडे,डॉ.संजय लोहे, रेखा राठोड, चंद्रपूर येथे किशोर पोतनवार,मितीन भागवत, हिराचंद बोरकुटे, गोपी मित्रा,अनिल दिकोंडवार,दिवाकर माणूसमारे, राजुरा येथे ऍड.मुरलीधर देवाळकर,पंढरी बोन्डे,कपिल ईद्दे,मधुकर चिंचोलकर,प्रभाकर ढवस, वरोरा येथे ऍड.शरद कारेकर, भद्रावती येथे सुधीर सातपुते, प्रा.सचिन सरपटवार,राजू बोरकर, कोरपना येथे अरुण नवले,रमाकांत मालेकर,बंडू राजूरकर,अविनाश मुसळे, सावली येथे गोपाल रायपूरे, मनोहर गेडाम, मूल येथे कवड्ड येनप्रेडीवार यांनी केले. गडचांदूर येथे प्रभाकर दिवे,मदन सातपुते, दीपक चटप, आशिष मुसळे,प्रवीण एकरे, पोंभुर्णा येथे गिरीधरसिहं बैस,टेकामजी व बबन गोरंटवार व जिवती येथे नीलकंठ कोरांगे, ऍड.श्रीनिवास मुसळे, शब्बीर जागीरदार, सय्यद इस्माईल यांनी केले.
लॉकडाउन काळातील वीज बिल माफ झालेच पाहिजे, दोनशे युनिट वीज मोफत मिळालीच पाहिजे,वीज बिल निम्मे करावे,शेती पंपाचे वीज बिल माफ करावे,वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. सर्व कार्यालयात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीचे निवेदन व वीजबिल स्वीकारले.
लॉकडाऊन काळात दोनशे युनिट पर्यंत वीज पुरवठा मोफत करण्यात यावा व सध्या दिलेली बिले परत घ्यावीत, विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये असताना घरगुती वापराकरिता सरासरी साडे सात रुपये बिलाची प्रती युनिट आकारणी केली जाते आणि औद्योगिक वापराकरिता प्रती युनिट साडे अकरा रुपये दर आकारले जातात. ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावे, गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ असल्यामुळे शेती पंपाचे सर्व थकीत वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, मागेल त्याला तात्काळ वीज पुरवठा करण्यात यावा आणि विदर्भातील लोडशेडींग संपविण्यात यावे,या मागण्या निवेदना द्वारे करण्यात आल्या आहेत.