तेलंगणा- महारष्ट्र सीमेवर अचानक वाढला बंदोबस्तचंद्रपूर : तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये "मोस्ट वॉंटेड' नक्षलवाद्यांची छायाचित्रे लावल्याने गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना ऊत आला आहे. नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले की काय, अशी शंकासुद्धा उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलीसांनी अचानक बंदोबस्त वाढवला. त्यामुळे गावकऱ्यांच्या शंकेला बळ मिळतेय. शेतमजुरीवर पोट असलेल्या गावकऱ्यांचे लॉक डाऊनमध्ये चांगलेच हाल झाले. त्यामुळे सरकारबद्दल त्यांच्या मनात असंतोष आहे. याचाच फायदा घेत युवकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न नक्षलवादी करु शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती तालुका तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर वसला आहे.अत्यंत मागास या तालुक्‍यात आदीम जमातीचे प्राबल्य आहे. वीस वर्षापूर्वी या परिसरात नक्षलवादी सक्रीय होते. अनेक हिंसक कारवाया या भागात झाल्यात. जिवती तालुक्‍यातील कुंभेझरी आणि दमपूर मोहदा येथे दोन नागरिकांना पोलिसांचे हस्तक समजून नक्षलवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. वणी या गावात बस जाळली. मारईपाटण -भारी रस्त्यावर सुरूंग स्फोट घडविला. यात अकरा पोलिस शहीद झाले. माकोडी पोलिस ठाण्याला आग लावली. उपाशी नाल्याचे बांधकाम सुरू असताना तीन अभियंत्यांचे नक्षल्यांनी अपहरण केले. राजुरा तालुक्‍यातील विरूर पोलिस ठाण्यावर गोळीबार केला.

ऐंशी-नव्वदच्या सुरवातीच्या दशकातील या घटना. नक्षली हिंसेने हा परिसर तेव्हा रक्तबंबाळ झाला होता. अनेकांनी आपली शेती, घरदार सोडून पलायन केले. त्यानंतर हळहळू हा परिसर शांत होत गेला. लगतच्या राज्यात हिंसक कारवाया केल्यानंतर जिवती तालुक्‍याचा वापर नक्षली रेस्ट झोन म्हणून करतात, अशी चर्चा फक्त होती. या काळात हिंसक कारवाया झाल्या नाही. मात्र शासकीय दस्ताऐवजात राजुरा मतदार संघाची अद्यापही नक्षलग्रस्त अशीच ओळख आहे. गेल्या एक महिन्यांपासून दोन्ही राज्यांतील पोलिसांचा बंदोबस्त सीमावर्ती भागात अचानक वाढला. त्यामुळे नक्षलवादी सक्रीय झाल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या हालचाली या भागात आहेत, याला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

घनदाट जंगल आणि डोंगर, दऱ्यांत वसलेल्या छोट-छोट्या गुड्यांमध्ये आदिम कुटुंबे राहतात. शेतमजुरी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. उन्हाळ्यात मोहफुले आणि तेंदूपत्ता तोडतात. तरूण मुले गत काही वर्षांपासून दुस-या राज्यांत कामासाठी जात आहेत. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या हातचे काम गेले. अनेक हालअपेष्टा सहन करत ते घरी पोहोचले. उन्हाळ्यातील मोहफुले आणि तेंदूपत्त्याचा रोजगारही कोरोनाने हिरावला. कुटुंबाची किमान गरजही भागत नाही, अशी परिस्थिती आहे. यातूनच व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात रोष आहे. त्याचाच फायदा घेत युवकांना गळी लावण्यासाठी नक्षली सक्रीय झाल्याचा तर्क पोलिस यंत्रणेने लावला आहे. या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागांतील दोन्ही राज्यांतील गावांमध्ये मोस्ट वॉंटेड नक्षल्यांची भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यातील कोणतीही व्यक्ती आपल्या भागात आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी तेलंगणातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी मुकदमगुडा येथे भेट दिली. सोबतच तेलंगणातील जैनूर मंडळ, सिरपूर मंडळ, नारनूर मंडळ आणि केरामेरी मंडळ या अंतर्गत येणा-या सर्वच गावांना भेटी देवून नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या. आता तेलंगणाचे पोलिस दुचाकीवर सीमावर्ती भागात गस्त घालत आहे. चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कामदगुडा येथे नुकतीच भेट दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील तब्बल 31 पोलिस कर्मचाऱ्यांना जिवती तालुक्‍यातील दोन पोलिस ठाणे आणि चार पोलिस उपकेंद्रात हलविण्यात आले. दुसरीकडे एका पोलिस तुकडीचे विशेष प्रशिक्षणसुद्धा चंद्रपुरात सुरू आहे.


Post a comment

0 Comments