वरोरा - भद्रावती तालुक्यातील वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर : वरोरा विधानसभेतील वरोरा व भद्रावती या दोन्ही तालुक्यातील वीज पुरवठा सुधारणा व्हावी म्हणून गत अधिवेशनात औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला असता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना उत्तरादाखल महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सुधारणा करण्याचे लेखी पत्राव्दारे कळविले आहे.
पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी तसेच कृषी पंपासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा लक्षात घेता महाराष्ट्र विद्युत नियंत्रक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना रात्रिकाळात १० तास किंवा दिवसा ८ तास ३ फ्रेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने नियमित सुरु केली आहे.
एकूण कृषी भारापैकी ५० % भार असलेल्या कृषी वाहिन्यांना दिवसा ८ तास व उर्वरित ५० % भार असलेल्या कृषी वाहिन्यांना रात्री १० तास अशी आठवड्यातून दोन वेळेस किंवा प्रत्येक आठवड्यास चक्राकार पद्धतीने विजेची उपलब्धता देण्यात येत आहे.
वरोरा मतदार संघातील भद्रावती तालुक्यामध्ये ०४ व वरोरा तालुक्यामध्ये ०३ असे एकूण ०७ नवीन ३३/११ के. व्ही उपकेंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच चंदनखेडा ता. भद्रावती उपकेंद्रामध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फार्मरची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे भद्रावती तालुका तसेच वरोरा तालुक्यामध्ये वीज ग्राहकांना योग्य दाबाचा नियमित वीज पुरवठा करण्यात येत आहे.
वरोरा तालुक्यातील काही भागात वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी साखरा येथे नवीन उपकेंद्र प्रस्तावित केले आहे. त्याबाबतीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून लवकरच साखरा येथे उपकेंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. तसेच पिल्ली ता. भद्रावती, नागरी ता. वरोरा येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरची उभारणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात वरोरा - भद्रावती तालुक्यातील वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यात आमदार प्रतिभा धानोरकर यांना यश आले आहे.

Post a comment

0 Comments