ताडोबामध्ये 4 दिवसात 3 वाघांचे कुजलेल्या अवस्थेत मृत्यूदेह सापडलेचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सीताराम पेठ भागात आणखी दोन वाघांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत रविवारी (ता. 14) आढळून आला. चार दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला. आता आणखी वाघाचे दोन मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तीनही वाघाच्या मृत्यूचे एकच कारण असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्या वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पूर्ण जंगलात शोध मोहीम सुरू आहे.

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. 10 जून रोजी व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ या गावालगतच्या तळ्याच्या काठावर एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता.हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चर्चा अजून सुरूच आहे. असे असताना याच भागातल्या घनदाट जंगलात आणखी दोन वाघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. या भागातील गस्ती पथकाला कुजलेल्या अवस्थेतील हे मृतदेह आढळून आले आहे.हे मृतदेह एक ते दीड वर्षे वयाच्या प्रौढ होऊ घातलेल्या बछड्यांचे असावेत असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे मृत्यू ज्या तळ्याच्या आसपास झाले. तिथेच काही माकडांचा ही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे तळेच दूषित झाले आहे काय किंवा कुणी या तळ्यातील पाण्यात मुद्दाम विष कालवले काय? याचा तपास वनविभाग करणार आहे. यासाठी या तळ्याच्या पाण्याचे नमुने वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. याच परिसरात वाघांचे चार दिवसात तीन मृतदेह आढळून आल्याने वनविभाग हादरून गेला आहे.


सीतारामपेठ हे गाव प्रकल्पाच्या अगदी सीमेवर आहे. या गावात शेतजमिनीही आहेत. त्यापैकी कुणी वाघांच्या वावरामुळे संतापून जात असे विषप्रयोग केले का? याचाही तपास वनविभागाला करावा लागणार आहे. सध्यातरी ताज्या दोन्ही ठिकाणचे नमुने ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास स्वयंसेवी संस्था-वन्यजीव तज्ज्ञ आणि वरिष्ठ वनाधिकारी करत आहेत.

Post a comment

0 Comments