दारूने घेतला तीन वाघांचा बळी
ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोंडेगाव शेतशिवारातील अवैध मोहा दारू काढण्याचा व्यवसाय बंद पडू नये म्हणून डुकराच्या मृतदेहावर विष (थिमेट) टाकून वाघीण व तिच्या दोन बछड्यांची तीन ग्रामस्थांनी शिकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ताडोबा व्यवस्थापनाने कोंडेगाव येथील सुर्यभान गोविंद ठाकरे (६०), श्रावण श्रीराम मडावी (४७) व नरेंद्र पुंडलिक दडमल (४९) या तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

करोनाच्या टाळेबंदीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पूर्णत: बंद असतांना १० जून रोजी मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ बिटातील संरक्षित वन कक्ष क्रमांक ९५६ च्या नाल्यामध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला होता .त्यानंतर, त्याच भागात अधिकची पाहणी केली असता १४ जून रोजी वाघिणीच्या दोन पिल्लांचे देखील कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले होते. तर, माकडाचेही मृतदेह आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली होती. प्राथमिक दृष्ट्या वाघिण व दोन पिल्लांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याच्या संशयावरून ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण, उपवनसंरक्षक गुरू प्रसाद यांनी तपास केला असता, लगतच्या कोंडेगाव शेतशिवारातील सुरू असलेल्या अवैध मोहा दारूचा व्यवसाय बंद होवू नये म्हणून वाघीण व बछड्यांची शिकार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली.

कोंडेगाव येथील सुर्यभान गोविंद ठाकरे, श्रावण श्रीराम मडावी व नरेंद्र दडमल या तिघांनी कोडेगाव शेतशिवारात मोहा दारू काढण्याचे काम जोरात सुरू केले होते. ही मोहा फुलाची दारू काढल्यानंतर निघालेल्या सडव्यावर डुक्कर मारण्याच्या उद्देशाने विष (थिमेट) टाकले होते. शिवाय, या परिसरात वाघाचा वावर आहे. वाघ असल्यामुळे नियमित पेट्रोलिंग होणार. पेट्रोलिंग झाले तर दारू व्यवसाय बंद पडू शकतो ही भिती देखील या तिघांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे वाघ दारू व्यवसायात अडचण ठरत असल्याचे बघून त्यांनी वाघाचीच शिकार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मेलेल्या डुकरावर आणखी विष प्रयोग करून वाघीण व दोन बछड्यांची शिकार करण्यात आली.

दरम्यान, शिकारीनंतर वाघीण व तिच्या बछड्यांचे मृतदेहाची विल्हेवाट करता आली नाही आणि या शिकारीचे बिंग फुटले. ताडोबा व्यवस्थापनाने या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण, ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक बी.सी.येळे, ए.जी.जाधव,वन परिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून करत आहेत. तर, अवैध दारूविक्रीने वाघीण व तिच्या दोन बछड्यांचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a comment

0 Comments