Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गोंडवाना विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाची परीक्षा ; नवे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू
गडचिरली :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी करोना टाळेबंदीमुळे युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाची परीक्षा घेऊ नये असे कळविले आहे. मात्र, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करुन १५ ऑगस्टपर्यंत निकाल लावून नवे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी युजीसीला परीक्षा घेऊ नये असे पत्र लिहिले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी १ जूनपासून महाविद्यालय सुरू करू असे म्हटले आहे. त्यामुळे परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे गडचिरोलीच्या परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी स्पष्ट केले आहे.यासंदर्भात परीक्षा विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती नेमली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परिक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परिक्षा घेतली जाणार आहे. उच्च शिक्षण संचालक, पुणे यांच्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्र परीक्षा घेण्यात येणार नसून त्यांना ५० टक्के ग्रेड अंतर्गत मुल्यमापनावर व ५० टक्के गुण मागील सत्रातील परीक्षेच्या सरासरी गुणावरून दिले जाणार आहेत.

अंतर्गत मुल्यमापनाचे गुण हे विषयाचे निरंतर मुल्यमापन, सत्रपूर्व परीक्षा व सत्रमध्य परीक्षा या आधारावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका व निरंतर मुल्यमापनाच्या राबविलेल्या प्रक्रियेचे दस्ताऐवज सीलबंद करून महाविद्यालयांना जतन करून ठेवावे लागणार आहे. विद्यापीठाने मागणी केल्यानंतर हे दस्ताऐवज विद्यापीठास द्यावे लागणार आहेत. विद्यापीठाव्दारे दिलेले गुण एखाद्या विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्याला प्राप्त श्रेणीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास हिवाळी परीक्षेसाठी अर्ज भरून परीक्षा देता येईल व त्या परीक्षेतील मिळालेले गुण अंतिम समजण्यात येतील.

तसेच जे विद्यार्थी समोरच्या सत्राच्या प्रवेशापासून वंचित झाले असतील व शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये नियमित प्रवेश नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅरी फारवर्ड पध्दतीने शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरविले जाईल. ही सुविधा फक्त विद्यमान शैक्षणिक वर्षासाठीच आहे.

ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा सर्वांकरीता टाळेबंदीचा कालावधी उपस्थिती म्हणून ग्राह्य धरला जाईल. विद्यापीठाव्दारे आयोजित परिक्षा ही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावरच आधारीत राहिल. आचार्य व एमफील विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी परिक्षा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतली जाईल. आचार्य व एमफीलच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शोधप्रबंध, प्रबंधिका सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत दिली आहे.

दरम्यान, महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात १५ जूनपासून सुरू होतील, शैक्षणिक उपक्रमांच्या पूर्व तयारीचा कालावधी हा ३० जूनपर्यंत असेल, पदविका अभ्यासक्रम, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परिक्षा वगळून इतर सर्व परिक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येतील असे गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies