चंद्रपुरातील पहिला कोरोनाबाधित रुग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह


शहरातील पहिल्या करोनाबाधित रूग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने चंद्रपुरवासियांसाठी ही चांगली बातमी ठरली. मात्र, त्यानंतर लगेच सायंकाळी आलेल्या अहवालात हैद्राबाद येथून चंद्रपूरात दाखल झालेला एक व्यक्ती करोनाबाधित मिळाला. तर गडचिरोलीत आज पुन्हा दोन नवीन करोनाबाधित रूग्ण मिळाल्याने तेथील एकूण रूग्णांची संख्या ८ झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याातील पहिल्या करोनाबाधित रुग्णाची १६ व १७ मे रोजी करोना संदर्भातील दोन्ही चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. चंद्रपूर शहरातील कृष्णनगर परिसरात हा रुग्ण १ मे रोजीच्या स्वॅब तपासणीत पॉझिटिव्ह ठरला होता. सध्या हा रुग्ण नागपूर येथे कोविडशिवाय अन्य आजारासाठी वैद्यकीय उपचार घेत आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण आता करोनामुक्त झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात आता केवळ एकमेव करोनाचा रूग्ण शिल्लक आहे. लवकरच या मुलीचीही दोन वेळा करोनाचाचणी केली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, हैद्राबाद येथून आलेली एक व्यक्ती करोनाबाधित मिळाली आहे. या व्यक्तीला विलगीकरणात ठेवले होते. त्याचे व कुटुंबाचे स्वॅब घेतले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. हा ५५ वर्षीय व्यक्ती दुर्गापूर येथील रहिवासी आहे.

तर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यातून व राज्यातून लोक येत आहेत. तेलंगणा, छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा गडचिरोलीला लागून आहेत. तर पुणे, मुंबई व ठाणे येथूनही लोक येत आहेत. आज येथे दोन नवीन करोना रूग्ण मिळाले. त्यामुळे या जिल्ह्यात आता करोनाबाधित रूग्णांची संख्या ८ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता बाहेर जिल्हा व राज्यातून येणाऱ्यांना दंड आकारणे सुरू केले आहे.

Post a comment

0 Comments