चंद्रपुरात स्वॅब तपासणीची छोटी प्रयोगशाळा सुरू

चंद्रपूर.15 मे (MH34UPDATENews) कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या बाबतची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वॅब तपासणीची सीबीएनएएटी ही छोटी प्रयोगशाळा चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारपासून सुरु करण्यात आली. करोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. सध्या येथील नमुने तपासणीसाठी नागपूर येथील तीन ठिकाणी जात आहेत. तथापि जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून या कामाला १४ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून सध्या त्याचे लघु स्वरूप असून येथे रोज ५० नमुने तपासले जाणार आहेत.
गुरुवारी ९ नमुने तपासल्या गेले. दरम्यान अतिगंभीर रुग्ण असल्यासच तपासणी तातडीने येथील प्रयोगशाळेत करण्याचे निर्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या यंत्रणेला करोना विषाणूंच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी कोविड तपासणी प्रयोगशाळा स्थापित करण्याकरिता तर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नवनिर्मित इमारतीमध्ये करोना वार्ड तयार करण्याकरिता २ कोटी ४३ लक्ष रुपये वितरित करण्यात आले. ही कामे प्रगतीपथावर असून प्रयोगशाळेत विदेशातून यंत्रसामुग्री लवकरच येणार आहे. पायाभूत सुविधांची व्यवस्था झाली आहे.तसेच करोना वार्ड देखील तयार झाला आहे. महिनाअखेर जिल्ह्यामध्येच स्वॅब तपासणी सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या ८-१० दिवसात या प्रयोगशाळेत दररोज किमान ३०० नमुने तपासले जाणार असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.

Post a comment

0 Comments