जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने आरोग्य तपासणी
चंद्रपूर, दि. 19 मे: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई व अन्य रेडझोन मधील नागरिक, कामगार, विद्यार्थी परतायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आरोग्य तपासणी करणे, होम कॉरेन्टाइन होणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहरात 2 मे व 13 मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या 2 पॉझिटिव्ह नागरिकांशिवाय अन्य कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप शहरात नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाकडून आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये दिलेल्या माहितीनुसार दिनांक 2 मे रोजी आढळलेल्या कृष्ण नगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केलेले आहे.कृष्णनगर येथील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे सदरील परिसराचे 14 दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून सध्या सर्वेक्षण बंद आहे.

तर,दिनांक 13 मे रोजी आढळलेल्या बिनबा गेट परिसरातील रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. रुग्णाच्या संपर्कातील सर्वच 7 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. या परिसरात 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये आतापर्यंत 482 नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहे.यापैकी 2 नागरिक पॉझिटिव्ह असून 427 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 53 नागरिकांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिक परत येत आहेत. या प्रत्येकाने आपली आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहरांमध्ये शकुंतला लॉन या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद व तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या ठिकाणी बस स्टँड परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या व्यापक आरोग्य हिताला लक्षात घेता. जबाबदार नागरिक म्हणून आपल्या नावाची नोंदणी करणे व आरोग्याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात 1 हजार 73 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी तालुकास्तरावर 875 नागरिक तर, चंद्रपुर महानगरपालिकेमध्ये 198 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे. तसेच गृह अलगीकरण करण्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 49 हजार 478 आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 14 हजार 554 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.


Post a comment

0 Comments