Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

धक्कादायक : रेड झोनमधून आलेल्या आरोग्यसेविकेने केले शेकडो बालकांचे लसीकरण
कोरपना (जि. चंद्रपूर) : तब्बल आठवडाभर रेडझोन क्षेत्रात वास्तव्य केलेल्या आरोग्यसेविकेने शेकडो बालकांचे लसीकरण केले. हा धक्कादायक प्रकार कोरपना तालुक्‍यात घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, लसीकरण झालेल्या बालकांच्या पालकांत शंकाकुशंकाना पेव फुटले आहे. आरोग्य विभागाने याची दखल भलेही घेतली नाही. पण गडचांदूर येथे राहात असलेल्या आरोग्यसेविकेबाबत नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला माहीती दिली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी तिला घरीच विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोनामुळे देश टाळेबंद झाला. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन सर्ववोतरी प्रयत्न करीत आहे.अशात रेडझोन क्षेत्रात तब्बल आठवडाभर वास्तव केलेल्या आरोग्यसेविकेने शेकडो बालकांचे लसीकरण केले. कोरपना तालुक्‍यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या खिर्डी येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकेच्या यवतमाळ येथील मामाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या आरोग्यसेविकेने रेडझोन असलेले यवतमाळ गाठले. नाकाबंदी असलेल्या क्षेत्रात आठवडाभर ती मुक्कामी होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी ती कोरपना तालुक्‍यातील खिर्डी या गावाला आली.

रेडझोन यवतमाळमधून आलेले असल्यामुळे नारंडाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या आरोग्यसेविकेचे विलगीकरण करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता उलट त्या आरोग्यसेविकेच्या हातून धामणगाव आणि नैतामगुडा येथील बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शिवाय, खिर्डी गावातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात आली आहे. हे सारे घडल्यानंतर ती गडचांदूरला आली. तेथील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये एका घरी भाड्याने राहून ती खिर्डीला सेवा देत आहे.

दरम्यान, ही बाब गडचांदूरकरांना माहिती होताच त्यांनी नगरपालिका प्रशासनाला कळविले. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांनी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता प्रथम तिने नकार दिला. मात्र, त्यानंतर कबुली दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभे यांच्या सहमतीनेच लसीकरण केल्याचे तिने सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून डॉ. स्वप्नील टेंभे यांना विचारणा केली असता आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरण गरजेचे नसल्याचे सांगण्यात आले. पालिका कर्मचाऱ्यांनी डॉक्‍टरला धारेवर धरल्यावर त्यांनी आरोग्यसेविकेला घरीच विलगीकरण होण्याचा सल्ला दिला आहे.

रेड झोनमधून आलेल्या आरोग्यसेविकेला कालपासून 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे. रेड झोनमधून आलेल्या आरोग्य कर्मचारी जर तो संक्रमित नसेल, तर त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याचेच पालन आम्ही केले आहे.
- डॉ. स्वप्नील टेंभे,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies