Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबई -पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांनी शकुंतला लॉनवर प्राथमिक तपासणी करावी : मोहिते


चंद्रपूर, दि.18 मे : चंद्रपूर शहरात मुंबई-पुणे व अन्य शहरातून आगमन होत असलेल्या नागरिकांनी आपली सर्व प्रथम तपासणी व नोंद शकुंतला लॉन येथे करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अन्य शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी संबंधित तालुक्याच्या बसस्थानकावर होत आहे तर गावपातळीवर आशा वर्कर कडून ही तपासणी होत आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लॉकडाऊन मध्ये शिथिलता जारी केल्यानंतर प्रत्येकाने आपल्या शहराकडे गावाकडे धाव घेतली आहे. मात्र गावाकडे शहराकडे व आपल्या तालुक्याकडे येणाऱ्या नागरिकांवर आता आपल्या परिसराच्या आरोग्याची व स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी आली आहे. या सर्वांनी ज्या परिसरातील नागरिकांच्या व कुटुंबाच्या भल्यासाठी आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान चंद्रपूर येथे महानगरपालिका व जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत शकुंतला लॉन येथे बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या थर्मल स्क्रीनिंग व अन्य आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आली आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका मोठ्या हिमतीने दिवस-रात्र काम करीत आहेत.

देशात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे व इतर महानगरात किंबहुना इतर राज्यांत नोकरीसाठी, कामासाठी गेलेले हजारो नागरिक आपल्या गावी परतले आहे. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर मोठा ताण आला आहे, मात्र कुठलाही ताण न घेता नागरिकांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे, असे समजूनच आरोग्य विभागाचे कर्मचारी जोमाने कामाला लागलेले आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सफाई विभागाचे कर्मचारी, शिक्षक कर्मचारी तसेच बाहेर गावांहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम करीत असून जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 550 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जिल्ह्यात विविध शहरांतून दाखल झालेल्या नागरिकांची प्राथमिक तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेमार्फत केली जात आहे. सध्या 2 वैद्यकीय अधिकारी, 2 परिचारिका, 1 आरोग्य सेविका, 15 शिक्षक कर्मचारी, तपासणीची कामे करीत आहेत. तर 4 सफाई विभागाचे कर्मचारी साफसफाईचे काम करीत आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात परराज्यातून व बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची वारंवार माहिती घेतली जात आहे.


जिल्ह्यातील नागपूर रोडवरील शकुंतला लॅान येथे परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नुसतीच तपासणी न करता तपासणी झालेल्या नागरिकांची दररोज माहिती घेण्यात येत असून, सर्व नागरिकांना कोरोना या आजाराजी माहिती देऊन घरातच राहण्याचा सल्ला वारंवार देण्यात येत आहे.

अशी होते प्रक्रिया:
परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेल्या सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग व महानगरपालिका आरोग्य विभाग पथक सज्ज असून सर्वप्रथम आलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यात येत असून वैयक्तिक माहिती भरून घेतल्या जात आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना होम क्वॉरेन्टाइनचा शिक्का मारून त्यांना 14 दिवसांकरिता होम क्वॉरेन्टाइन करण्यात येत आहे.

Post a comment

0 Comments