लॉकडाऊनमध्ये पोलीस शिपाई करत होता दारू तस्करी आणि मग...
चंद्रपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस शिपाई मोरेश्वर गोरे (वय 34) हा एम एच 26 यू 0786 या टाटा सफारी वाहनाने वणीत आला. त्याने विदेशी दारूचे 750 एमएलचे 12 बंपर घेतले तो चंद्रपूरच्या दिशेने निघाला.

 
वणी (जि. यवतमाळ) : कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू होती. पोलिसांकडून अनेक दारू तस्करांवर कारवाई करण्यात आली. मात्र, आता चक्क पोलिस शिपाईच दारू तस्करी करीत असल्याचे आढळून आले असून, शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर येथे कार्यरत पोलिस शिपायाला अटक केली.

कोरोना या विषाणूजन्य आजाराने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. यामुळे संपूर्ण जगासह भारतातही मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यादरम्यान दारूचे दुकानही बंद करण्यात आल्याने तळीरामांचे मोठी फजिती होत आहे.

तळीरामांचे चोचले पुरवण्याकरिता अवैध दारूविक्री सुरू झाली. त्यातच लगतच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने तेथील मद्यप्रेमींची वणीकडे नजर होती. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने 11 मेपासून यवतमाळ जिल्ह्यात दारूविक्रीला परवानगी दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यप्रेमीचा ओढा शहराकडे वाढला होता.

आड रस्त्याच्या मार्गाने अनेक जण वणीत येऊन आपली तृष्णा भागवायचे. यात पोलिसही मागे नाहीत. चंद्रपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस शिपाई मोरेश्वर गोरे (वय 34) हा एम एच 26 यू 0786 या टाटा सफारी वाहनाने वणीत आला. त्याने विदेशी दारूचे 750 एमएलचे 12 बंपर घेतले तो चंद्रपूरच्या दिशेने निघाला. शिरपूर पोलीस ठाण्या हद्दीत येत असलेल्या बेलोरा केलेल्या नाकेबंदीदरम्यान या वाहनांची तपासणी करण्यात आली असता वाहनात सोळा हजार रुपये किमतीची विदेशी दारू आढळली.

वाहन चालवत असलेल्या गोरे याला ताब्यात घेतले असता त्याने आपण पोलिस असल्याची बतावणी केल्याने शिरपूरचे ठाणेदार अनिल राऊत अवाक्‌ झाले. मात्र, गुन्हा तो गुन्हा असतो मग तो पोलिस असो की कुणीही असो त्याला ताब्यात घेऊन चार लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसच दारू तस्करी करीत असताना आढळून आल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, याची परिसरात चांगलीच चर्चा आहे

Post a comment

0 Comments