Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ट्रोलिंग म्हणजे काय?

ट्रोल करणे किंवा जाणूनबुजून ट्रोल करून घेणे खूप सोपे असते. नाचवणारा दुनियेला कसाही नाचवू शकतो...

लेेनख :- अभि सुरेश वांढरे
लेखन :- अभि सुरेश वांढरे

चंद्रपूर :- गंमत म्हणून सुरू झालेल्या ट्रोलिंगने आज भयानक रूप धारण केलंय. हलकी फुलकी मजा मस्करी आता संघटित व्यापारी स्वरूपात वाईट उद्देशाने वापरली जातेय. आणि यात आपल्याला वापरून घेतलं जातंय हे कळेपर्यंत उशीर झाला असतो किंवा ते शेवटपर्यंत कळतही नाही. सोशल मीडियामुळे अनेक फायदे झाले असले तरी सायबर क्राईममध्येही वाढ झाली आहे. या सायबर गुन्ह्याचे थोडे सौम्य स्वरूप म्हणजे ट्रोलिंग!

हा शब्द कुठून आला याचे मूळ शोधले असता युरोपात प्रचलित असणारी दंतकथा समजली. स्कँडीनेव्हिया देशात एक बेढब शरीर आणि भयानक चेहरा असणारा प्राणी राहायचा. हा लोकांना त्रास देत असे. या प्राण्यामुळे लोकांना दैनंदिन जीवन जगणे आणि प्रवास करणे कठीण झाले होते. या प्राण्याचे नाव होते… ट्रोल. इंटरनेटवर होणाऱ्या त्रासाला ट्रोलिंग हे नाव याच्यामुळेच पडले. तसा ट्रोलिंगचा इंग्लिशमध्ये सरळ साधा अर्थ मासेमारी असाही होतो पण सोशल मीडियावर तरी वेगळं काय असतं? गळ लावून, जाळे फेकून मासा अडकवणे हेच ना?

"सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन वैयक्तिकरित्या अथवा संघटितपणे एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीसमूहाला उकसवणे, भडकवणे आणि विषयावर न बोलता त्या सुरळीत चाललेल्या विषयाला वेगळे वळण देणे म्हणजे ट्रोलिंग" अशी आपल्याला याची व्याख्या करता येईल. ट्रोल करताना लिखाण, ऑडिओ आणि व्हिडीओचा वापर केला जातो.

या ट्रोलिंग मधून कुणीही सुटत नाही. सर्वसाधारण व्यक्ती असो वा सेलिब्रिटी, पत्रकार असो राजकारणी, व्यावसायिक असो वा चाकरमानी, पक्ष, धर्म, पंथ, जात, संघटना… कुणालाही यातून सुट्टी नाही. ट्रोलिंगचे ढोबळमानाने तीन प्रकार पडतात.

1. कॉर्पोरेट ट्रोलिंग - एखाद्या व्यावसायिक कंपनीला नफा मिळावा किंवा एखाद्या व्यवस्थित सुरू असणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघावे हा यामागचा उद्देश असतो. हे काम पैसे देऊन केले जाते. उगाचच सुमार कंपनीच्या भलामण करणाऱ्या पोस्ट दिसू लागल्या किंवा अचानक कुण्या कंपनीला शिव्या देणाऱ्या पोस्टमध्ये वाढ दिसू लागली की समजून जावं, हे कॉर्पोरेट ट्रोलिंग सुरू आहे.

2. पॉलिटिकल ट्रोलिंग - हा प्रकार आपल्या सर्वांच्या व्यवस्थीत परिचयाचा आहे. राजकीय पक्ष जसे पूर्वी ग्राउंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते बाळगून असत त्याच प्रकारे आता ट्रोल करणारे भाडोत्री कार्यकर्ते बाळगून असतात. एखादा मुद्दा कसा भटकवावा, महत्वाच्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष कसे दुसरीकडे वळवावे, आपल्याला अडचण ठरु शकणाऱ्या मुद्द्यांना कशी व्यवस्थित बगल द्यावी, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर/चारित्र्यावर कसे शिंतोडे उडवावे, आपल्या पक्षाविषयी लोकांच्या मनात कशी सहानुभूती निर्माण करावी वगैरे बाबी पॉलिटिकल ट्रोलिंग मध्ये येतात.
यात इतर देशात आणि भारतात एक मूलभूत फरक आहे. भारतात असंख्य विचारधारा व धर्माचा पगडा असल्याने आणि भावनेच्या भरात भारतीय लोक चटकन अडकत असल्याने इथे ही ट्रोलिंग करणे फार सोपे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा कुठलातरी मुद्दा उचलून तो काही मोजक्या पेड ट्रोल्सद्वारे पेटवायचा अवकाश, की त्याचे समर्थक आणि विरोधक आपोआप एकमेकांवर तुटून पडतात. काही दिवस तो मुद्दा चर्चेत राहतो आणि महत्वाचा मुद्दा मागे पडतो.

3. पर्सनल ट्रोलिंग - एखाद्या व्यक्तीवर टीकेची झोड उठवणे, शिवीगाळ करणे याला वैयक्तीक ट्रोलिंग म्हणतात. ही ट्रोलिंग राजकीय दृष्ट्या प्रेरित असू शकते किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे, त्याच्या विचारसरणीमुळे, वागण्याबोलण्यात असणाऱ्या विसंगतीमुळे किंवा लिखाणात चुकल्यामुळे होऊ शकते. आपले महागुरू हे वैयक्तिक ट्रोलिंगचे ठळक उदाहरण आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या माझा कट्टावर केलेल्या विधानामुळे आणि एका गाण्यामुळे नुकतीच त्यांच्यावर ट्रोलधाड पडली होती. आणखी एक उदाहरण म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. तिकडे विराट अपयशी ठरला की इकडे अनुष्का ट्रोल व्हायला सुरुवात होते इतकी गमतीशीर मानसिकता ट्रोलर्स लोकांची आहे. सैफ-करीनाचा मुलगा तैमुर हे आणखी एक उदाहरण.

आता प्रश्न येतो की लोक ट्रोल का करतात?
यात मोजके पैसे घेऊन ट्रोलिंग करणारे लोक सोडले तर बाकी सामान्य लोकांना यातून काय मिळतं? उत्तर अतिशय सोपं आहे… आनंद! काही वेळा विकृत आनंद. निखळ ट्रोलिंग केली तर एकवेळ समजू शकतो पण विनाकारण एखाद्या स्त्री/पुरुषावर त्याची मते पटत नाहीत म्हणून ट्रोलिंग करणाऱ्यामध्ये आणि चालत्या ट्रेनवर दगड फेकून आनंद घेणाऱ्यामध्ये फरक करता येत नाही. काही वेळा हा मनोविकार सुद्धा असू शकतो. प्रत्यक्ष समाजात दुर्लक्षित व्यक्ती सोशल मीडियावर अटेंशन सिकिंग साठी ट्रोलिंग करते हे ही बऱ्याचदा दिसून येतं. मानसिकरित्या अस्थिर व्यक्ती सुद्धा ट्रोल करण्यात आघाडीवर असते. काहीवेळा इतरांचा राग कुणालातरी ट्रोल करून काढला जातो तर काहीवेळा कुशाग्र मेंदूमधील ज्ञान इतरत्र बाहेर काढता येत नाही म्हणून ट्रोलिंगचा आधार घेतला जातो.

हे ट्रोलिंग टाळता येऊ शकतं का?
याचं उत्तर नाही असं आहे. आपले सोशल मीडियावर अकाउंट असेल तर आपण केव्हाही ट्रोलिंगचे शिकार होऊ शकतो हेच खरं. भारतात ट्रोलिंग विरोधी काही कायदा अस्तित्वात नाही. ट्रोलिंग मर्यादेच्या बाहेर जाऊन जर मारहाण करण्याच्या किंवा जीवे मारण्याच्या धमक्या येत असतील तर मात्र तक्रार दाखल करता येते आणि त्यावर बऱ्याचवेळा पोलिसांतर्फे योग्य तपासाअंती कारवाई सुद्धा होते. पण तरीही, काही उपायांनी आपण याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो.

1. ट्रोलिंगमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव नसला तरी याचा जास्त त्रास स्त्रियांनाच होतो हे उघड सत्य आहे. पण कुणीही असो, अनोळखी माणसांना आपल्या यादीत प्रवेश देऊ नये. जर कुणाकडून त्रास होण्याची शक्यता वाटत असेल तर त्या व्यक्तीला ताबडतोब अनफ्रेंड किंवा ब्लॉक करावं.

2. ट्रोल करणाऱ्याचा मुख्य उद्देश तुम्हाला मानसिक त्रास व्हावा हाच असतो. त्याचा हा उद्देश सफल होऊ नये म्हणून त्याच्या कमेंट्सवर चिडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ नये. उलट त्याने चीड येण्यासारखी कमेंट टाकली तर तुम्ही विनोदी रिप्लाय द्यावा. तो एक दोन कमेंट करून नाद सोडून देईल. किंवा हे ही नको असेल तर त्याला काही उत्तरच देऊ नये. ट्रोलर जर उत्तर मिळत नसेल तर कंटाळून निघून जातो.

3. सर्वात महत्वाचं, मी कित्येक वेळा ही गोष्ट पूर्वीही सांगितली आहे… फेक अकाउंट अजिबातच लिस्टमध्ये घेऊ नये. फेक असल्याची थोडी जरी शंका आली तर सरळ ते अकाउंट रिपोर्ट करून ब्लॉक करावं. फेक अकाउंट कसं ओळखावं यावर पूर्वी लेख लिहिला आहे. गरज पडल्यास तो रेफर करा.

4. काहीवेळा अधिक लोकप्रियता मिळवण्यासाठी अनोळखी व्यक्तींच्या पोस्टवर, न्यूज पोर्टलवर किंवा कुठल्यातरी पेजवर कमेंट केल्या जातात. भारंभार कमेंट्स करणं टाळावं. आपले फ्रेंड सर्कल मर्यादित ठेवल्यास बऱ्याच समस्यांपासून सुटका होते. आपल्या आसपास समविचारी, अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्ती जितक्या जास्त असतील तितकाच ट्रोलिंगचा धोका कमी होतो.

शेवटी एवढंच सांगेन, सोशल मीडिया चांगल्या वाईट दोन्ही स्वभावाच्या माणसांनी मिळून बनला आहे. इथे ट्रोलिंग होतच राहणार… पण त्याचा किती त्रास करून घ्यायचा ते शेवटी आपल्याच हाती आहे.
@ अभि सुरेश वांढरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies