पालकांनो सावधान ! दारू तस्करीत बालकांच्या होतोय वापर
वणी (जि. यवतमाळ) : दारू तस्करीत अल्पवयीन मुलांचा वापर केल्या जात असल्याचे वास्तव सोमवारी (ता.18) केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. रासा येथील व्यक्तीस 55 हजारांच्या मुद्देमालासह वणी पोलिसांनी अटक केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यामुळे सीमावर्ती भागातून दारू तस्करीला चांगलाच जोर आला आहे. दारू तस्कर नवनवीन युक्‍त्यांचा वापर करीत आपले मनसुबे पूर्णत्वास नेत आहे. दारू तस्करीसाठी आलिशान वाहनांसह सिलिंडर, स्कूल बॅगचासुद्घा वापर दारू तस्करांकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या तस्करांचे बिंग वेळोवेळी फोडल्याने आता तर चक्क अल्पवयीन बालकांनाच या दारू तस्करीच्या व्यवसायात ओढल्याचे दिसत आहे.सोमवारी दुपारच्या सुमारास पोलिस गस्तीवर असताना दोन व्यक्‍ती दुचाकीने रासा येथे देशी दारू नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी सतीघाटजवळ सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता, देशी दारूचे 96 पव्वे आढळून आले.

या प्रकरणी दशरथ मेश्राम (रा. रासा) याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात व्यक्ती अवैध दारू तस्करीकरिता अल्पवयीन बालकांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, अमित पोयाम यांनी केली.

Post a comment

0 Comments