चंद्रपूर : उगवण क्षमता तपासलेल्या घरगुती सोयाबीन बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करा; कृषी अधीक्षकांचा सल्ला
चंद्रपूर/MH34UPDATENew
चंद्रपूर.15 मे (हिं.स.) : शेतकऱ्यांनी स्वतःकडे बियाणे योग्य पद्धतीने साठवणूक करून ठेवल्यानंतर स्व:उत्पादित बियाण्याचा खरीप हंगामात पेरणीसाठी वापर केल्यास खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढून पेरणीसाठी बियाण्याचा तुटवडा निर्माण होणार नाही. यासाठी शेतकऱ्याने पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहेशेतकऱ्यांने व उत्पादित सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यासाठी पुढील बाबी विचारात घ्याव्यात. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणाचे असतात त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. मागील 2 वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणिक बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो व शास्त्रीय दृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित बियाण्याची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करावी. सोयाबीन बियाण्याचे बाह्यवरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवणूक केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रत्येक कृषी सहाय्यकाने आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन पिकांचे अपेक्षित क्षेत्रात 70 टक्के बियाण्याची गरज त्यात गावातील निवडक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उत्पादित बियाण्यातून भागविण्यात येईल असे नियोजन करावे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2019 मध्ये प्रमाणित सोयाबीन बियाणे पेरले होते अशा शेतकऱ्यांकडील उपलब्ध बियाण्याची माहिती संकलित करावी व हे बियाणे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरण्यास प्रवृत्त करावे. शेतकऱ्यांनी स्वतःकडील राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमतेची तपासणी/ चाचणी करणे फार गरजेचे असते. त्यावरून चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबद्दल अंदाजही येऊ शकतो. उगवण क्षमतेची तपासणी घरच्या घरी करता येते व ही पद्धत अतिशय सोपी आहे.
सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता घरच्या घरी कशी तपासावी याबाबतची माहिती: शेतकऱ्यांनी स्वतः कडे असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान/ खूरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराची बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा 1 कागद घेऊन त्याला 4 घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येक 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार कराव्यात नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत 4 दिवस कशा ठेवाव्यात चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजाकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 60 असेल तर उगवण क्षमता 60 टक्के आहे असे समजावे. जर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमता 80 टक्के आहे असे समजावे. अशा पद्धतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्के पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी प्रति हेक्टणर 75 किलो बियाणे वापरावे. शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता उपरोक्त पद्धतीने घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्यांची पेरणी करावी. उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास त्याचे त्याप्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन उगवणक्षमतेनुसार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची उगवणक्षमता 70 टक्के असल्यास पेरणीसाठी आवश्यक बियाणे 30 किलो प्रती एकरसाठी वापरावे. उगवणक्षमता 69 टक्के असल्यास पेरणीसाठी 30.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवनक्षमता 68 टक्के असल्यास पेरणीसाठी 31 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवण क्षमता 67 टक्के असल्यास पेरणीसाठी 31.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवण क्षमता 66 टक्के असल्यास पेरणीसाठी 32 किलो/ एकर बियाण्यांचा वापर करावा. उगवण क्षमता 65 टक्के असल्यास पेरणीसाठी 32.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवण क्षमता 64 टक्के असल्यास पेरणीसाठी 33 किलो/ एकर बियाण्यांचा वापर करावा. उगवण क्षमता 63 टक्के असल्यास पेरणीसाठी 33.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवणक्षमता 62 टक्के, 61 टक्के , व 60 टक्के असल्यास 34 किलो/ एकर,34.5 किलो/ एकर व 35 किलो/ एकर बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा. रायझोबियम व पीएसबी या जिवाणूसंवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 3 तास अगोदर बीज प्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशी रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.बियाण्याची पेरणी पुरेशी ओलिवर आणि 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी.पेरणीसाठी प्रति हेक्टारी दर 70 किलो भरून 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धत (बी. बी. एफ) यंत्राने पेरणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. पेरणीपूर्वी सोयाबीन उगवणक्षमता बीज प्रक्रिया इत्यादी प्रात्यक्षिके प्रत्येक गावात आयोजित करावेत व वरील प्रमाणे सुचनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments