गडचंदुर पो.स्टे. च्या समोर दारुड्यांची गर्दी, मात्र अधिकारी मूग गिळून चूप!
गडचांदूर (प्रति.) : गुरुवार दिनांक 6 मे रोजी गडचांदूर मध्ये तेलंगाना येथील विदेशी दारू मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आली होती. शहरातील मुख्य ठिकाणी त्याची विक्री झाली. दारुड्यांना जसजशी ही माहिती मिळाली तसतशी त्या ठिकाणी गर्दी जमा होऊ लागली, महत्वाचे म्हणजे गडचांदूर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर नेहमीच्या ठिकाणांवर सर्रास दारू विक्री होत होती, परंतु गडचांदूर चे पोलिस अधिकारी झोपेत असल्याचे सोंग घेऊन उगे-मुगे होते. नोंद करण्यालायक बाब म्हणजे विरूर पोलिसांनी आज तेलंगाना येथून येणारा दहा लाखाचा सुगंधित तंबाखूवर कारवाई केली. संचारबंदीचा ताण त्यांना ही आहे, कर्तव्यात कसूर नाही याचे हे जिवंत उदाहरण आहे आणि गडचांदूर मध्ये पोलिसांच्या नाकावर नींबू टिच्चून अगदी पोलिस स्टेशनसमोर तळीराम आपली हौस पूर्ण करत असतांना गडचांदूर पोलिसांचे नायक गोपाल भारती यांचे याकडे कसे काय लक्ष गेले नाही, ही बाब गंभीर आहे. फक्त याच भागात नाही तर प्रभाग क्रमांक 8, प्रभाग 4 आदि अवैध दारू विक्री पुर्वी ज्या ठिकाणी विदेशी दारू मिळायची त्याठिकाणी आज दारुड्यांनी आपली हौस भागवली. मिळालेल्या वृत्तानुसार आज तेलंगाना येथून फार मोठा दारूसाठा गडचांदूर शहरामध्ये पोहोचविण्यात आला. गडचांदूर चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती व त्यांची टीम यावेळी काय करत होती, हा विषय गांभीर्य जनक आहे. तेलंगाना बॉर्डर ला लागून असलेले मोठे शहर गडचांदूर हेच आहे. चोर रस्त्याने तेलंगणावरून गडचांदूर ला यायला जास्त अवधी लागत नाही. यापूर्वी अनुभव बघता प्रत्येक चोर रस्ते हे गडचांदुर पोलिसांच्या नजरेत आहेत, मग आज या ठिकाणाहून दारूचा पुरवठा होत असतांना गडचांदूर पोलीस व त्याचे प्रमुख गोपाल भारती मुंग गिळून कसे राहिले? अगदी पोलिस स्टेशन समोर दारू विक्री होत असतांना कुणाच्याही कसे नजरेत आले नाही की सारेजण फक्त संचारबंदीच्या कामासाठी मग्न आहेत असा प्रश्नच गडचांदूर चे सुज्ञ नागरिक आज विचारू लागले आहेत. गडचांदूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी त्वरित या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे