Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

टोळ धाड किडीची वेळीच उपाययोजना कराकृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे आवाहन

चंद्रपूर, दि. 27 मे: वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी किड असुन ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करु शकते. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना करण्याचे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. व्हि. जी. नागदेवते, कीटकशास्त्रज्ञ प्रवीण देशपांडे यांनी केले आहे.

वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया हे आहे. ही किड दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते पहिली अवस्था म्हणजे एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही किड एकटी किंवा विरळ असते. अनुकूल हवामानात ही किड समुहाने किंवा थव्यात आढळते आणि या अवस्थेला समूह अवस्था किवा थव्याची अवस्था असे म्हणतात. थव्याच्या अवस्थेत ही किड मोठे अंतर भ्रमण करु शकते व मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करु शकते.

राजस्थानातून मध्यप्रदेशात थैमान घालून सातपुडा पर्वत रांगामधुन अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील उत्पादक पट्ट्यात टोळधाडीचे थवे पोहोचणे व लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सुद्धा या किडीचे थवे पोहोचले. यात नुकसान करण्याची क्षमता व शक्यता ओळखून हवेच्या दिशेने वाटचाल करुन किंवा अन्नाची उपलब्धता नुसार चंद्रपूर जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

वाळवंटी टोळ या किडीचे जीवनचक्र:

वाळवंटी टोळ या किडीच्या जीवनचक्रात तीन अवस्था असतात.

अ)अंडी अवस्था: या किडीची प्रौढ मादी 150 ते 200 अंडी ओलसर रेताड जमिनीत शेंगेसारख्या लांबुळक्या आवरणामध्ये समुहाने घालते. हे. शेंगे सारखे आवरण रेती मध्ये 10 ते 15 सेंटीमिटर आत असते.जमिनीतील ओलावा.आद्रता व तापमानानुसार अंडी उगवण्याचा कालावधी 10 ते 12 दिवसापासून चार आठवड्यापर्यंत राहु शकतो.

ब) पिल्ल अवस्था: अंडी उगवल्यानंतर त्यातून या किडीचे पिल्ले बाहेर पडतात. टोळ या किडीच्या एकाकी अवस्थेत पिल्लांच्या 5 अवस्था तर समुह किंवा थवा अवस्थेत पिलांच्या 6 अवस्था असतात. साधारणता 37 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असल्यास पिल्ले 22 दिवसात तर 22 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असल्यास या किडीची पिल्ले अवस्था 70 दिवसात पूर्ण होते.

क) प्रौढ अवस्था: पाचव्या अवस्थेतील या किडीची पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. सुरुवातीच्या काळात प्रौढावस्थेत पंख नाजुक असल्यामुळे ते उडु शकत नाहीत.परंतु, परिपक्व प्रौढावस्थेत ते उडु शकतात. हीच अवस्था पिकांना व झाडांना जास्त नुकसानदायक अवस्था असते. ही प्रौढावस्था 15 ते 20 दिवसात पूर्ण होते. परंतु, थंड वातावरण असेल तर हे प्रौढ 8 महिन्यापर्यंत तग धरु शकतात. सर्वसाधारणपणे चार आठवड्यात प्रौढ प्रजननक्षम बनतात. नर हे मादी पुर्वी प्रजननासाठी सक्षम होतात. मादी टोळ समागमानंतर दोन अंडी घालतात. एकट्या अवस्थेतील प्रौढ टोळ जास्त अंतर उडु शकत नाही.परंतु, समुहाच्या किंवा थव्याच्या अवस्थेतील परिपक्व प्रौढ खाद्याच्या व अन्नाच्या शोधात फार मोठे अंतर उडून जाऊ शकतात किंवा भ्रमण करु शकतात. तरुण व अपरिपक्व अवस्थेतील टोळ या किडीचे प्रौढ गुलाबी रंगाचे व थंड वातावरणात लाल व करड्या रंगाचे असतात. समुह अवस्थेतील किंवा थव्याचा अवस्थेतील वाळवंटी टोळ या किडीचे प्रौढ हे चमकदार व पिवळ्या रंगाचे असतात.


वाळवंटी टोळ या किडीचा नुकसानीचा प्रकार:

वाळवंटी टोळ या किडीची पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने वाटेतील वनस्पतीचा फडशा पाडत पुढे सरकतात. सायंकाळ झाल्यावर हि टोळ झाडाझुडपांमध्ये वास्तव्यास राहते. पुर्ण वाढलेले प्रौढ टोळ अतिशय चपळ खादाड असतात व हे प्रौढ झाडाची हिरवी पाने फुले व फांद्या व इतर भागाचा फडशा पडतात व पिकाचे अतोनात नुकसान होते.

वाळवंटी टोळ या किडीचे व्यवस्थापन:

सर्वसाधारणपणे 10 हजार प्रौढ टोळ प्रती हेक्टर किंवा 5 ते 6 पिल्ले प्रती झुडूप अशाप्रकारे किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन शेतकरी बंधु गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी पुढील उपाय योजना करु शकतात.

शेतात टिनाचे डबे, प्लॉस्टीक बॉटल, वाद्य व इतर साहित्याचा वापर करुन मोठी आवाज काढल्यास ही किड तुमच्या शेतात बसणे टाळेल.

शेतात कडूनिंब, धोत्रा इतर तण किंवा पालापाचोळा जाळून धुर व शेकोटीचा वापर केल्यास या धुरामुळे तुमच्या शेतात बसणे टाळेल.

या टोळधाडची सवय थव्याने एक दिशेने दौडत जाण्याची असल्यामुळे पुढे येणाऱ्या थव्याच्या वाटेवर 60 सेंटीमीटर रुंद व 75 सेंटीमीटर खोल चर खोदुन त्यात या पिल्लांना पकडता येते.

संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होत असल्यामुळे अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून धुर केल्याने किडीचे व्यवस्थापन मिळते.

थव्याच्या स्थितीत पिलांची संख्या जास्त असल्यास पाच टक्के निबोळी अर्क किंवा निंबोळी तेल 50 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करु शकता.

20 किलो गहू किंवा धानाच्या तुसामध्ये फिप्रोनील 5 एससी 3 मिली मिसळून याचे ढिक शेतात ठेवावे याकडे टोळधाड आकर्षित होऊन कीटकनाशकांमुळे मरतात.

गरजेनुसार आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन क्लोरोपायरीफॉस 20 अ प्रवाही 24 मिली अधिक 10 लिटर पाणी किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी प्रमाणात घेऊन कोणत्याही एका किटकनाशकाची गरजेनुसार व प्रादुर्भावानुसार फवारणी करा. किंवा केंद्रीय कीटकनाशक बोर्ड यांनी सुचवलेल्या कीटकनाशकांचा प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापर करावा. यामध्ये लॅमडा 5 इसी 10 मिली, क्लोरोपायरीफॉस 20 इसी 24 मिली वापरावे.

शेतकरी बंधुनो फवारणी करतांना लेबल क्लेम प्रमाणे करावी, अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करणे टाळावे, प्रमाण पाळावे व फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies