Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बियाण्यांची निवड व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी
कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीचे आवाहन

चंद्रपूर, दि.25 मे: जिल्ह्यातील शेतकरी या खरीप हंगामात धान पेरणीच्या तयारीसाठी लागले असून जमीन नांगरणे ढेकळे फोडणे तसेच जमीन भुसभुशीत करून पर्यंत टाकण्याकरीता सर्व शेतकरी तयार आहेत. पुरेशा पावसाच्या आगमनानंतर पेरणी केल्या जात असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रमाणित बियाण्यांची निवड व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. योग्य धान बियाण्याची निवड करताना धानाचे गुणधर्म, पिकाचा कालावधी व त्यांची उत्पादन क्षमता, रोग व किडी प्रतिकार व प्रतिबंधात्मक क्षमता बियाण्याचे स्त्रोत जाणून घ्यावे व लहान बियाण्यांचा वापर करावा.

जसे आपण आपल्या बाळाचे लसीकरण करून संरक्षण करतो तितकेच महत्त्वाचे म्हणजे पिकाच्या जीवनात बीज प्रक्रिया करण्याचे असते. हे महत्त्व लक्षात घेता आपल्या पिकाची लसीकरण करून संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र ,सिंदेवाहीचे डॉ.उषा डोंगरवार यांनी केले आहे.

बीज प्रक्रिया म्हणजे हलके रोगमुक्त सर्वसाधारणपणे आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करणे व बाकी चांगल्या बियाण्यांचे रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी औषधांचा वापर करणे तसेच उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूच्या भुकटी चोळून लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. रोग निर्माण होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय हा सर्वोत्तम पर्याय असतो म्हणून बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

बीज प्रक्रिया करण्याचे फायदे व महत्त्व:

पेरणीसाठी एक समान बियाणे उपलब्ध होते, बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करणे शक्य होते. रोग व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते तसेच उत्पादनात वाढ होते. बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते. बियाण्यांची उगवण शक्ती वाढून उत्पन्न वाढते. पीक एकसारखे वाढत असून बियाण्यांचा दर्जा वाढला जाऊन बाजारभाव चांगला मिळतो.

धान्य बियाण्यास मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी:

या प्रक्रियेकरीता 300 ग्रॅम मीठ प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे जेणेकरून 3 टक्के मिठाचे द्रावण तयार होईल. अशा मिठाच्या द्रावणात धानाचे बियाणे टाकून 3 ते 4 वेळा ढवळावे. हलके रोगीट व दोषयुक्त पोचट बियाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगून जमा होईल. ते बियाणे काढून नष्ट करावे तसेच बुडाशी बसलेले निरोगी रोगमुक्त वजनदार बियाणे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. बियाणे वाळल्यानंतर पोत्यात भरून ठेवून व त्याचे तोंड उघडे ठेवावे. पेरणीच्या दिवशी त्या बियाण्यास जिवाणू खते व बुरशीनाशकांची ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया:

बुरशीनाशकाची बीजप्रक्रियेचा करपा, आभासमय काजळी, राईस बंट या रोग व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. याकरिता थायरम 75 टक्के, डब्ल्यू एस 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात प्रक्रिया करावी.

जिवाणू खते: जिवाणूखत संपूर्ण सेंद्रिय वर सजीव असून त्यामध्ये कोणतेही अपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नसतात. हवेतील नत्र शोधून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जिवाणू खते म्हणतात. उदा. स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत, अझोटोबॅक्टर जिवाणू खते, एकदल व तृणधान्ये पिकासाठी जसे भात,गहू, ज्वारी, बाजरी,कपाशी तर रायडू जीएम जिवाणू खते फक्त शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी आवश्यक असते.

जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया:

अझोटोबॅक्टर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू म्हणून कार्य करते. वातावरणातील नत्रवायू वनस्पतींना सरळ घेता येईल अशा अवस्थेत उपलब्ध नसते. मात्र अझोटोबॅक्टर मित्र जीवाणूची 25 ग्रॅम प्रति किलो धान बियाण्यास बीज प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते व धानाला नत्र उपलब्ध होते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होण्यास मदत होते.

स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) हे प्रामुख्याने धानामध्ये बीजप्रक्रियेत 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरले जाते. यामुळे जमिनीतील स्फुरद जे अधूलनशिल अवस्थेत असते त्यास विरघळवून पिकाला उपलब्ध करून देण्यास मदत होते.

ट्रायकोडर्मा (रोग नियंत्रक बुरशी) ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पद्धत म्हणजे बीजप्रक्रिया होय. पेरणीच्या वेळी 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. या सर्व बियाण्यांवर सारखा थर लागेल याची काळजी घ्यावी.

जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया वापरायची पद्धत:

एक लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे. हे द्रावण थंड झाल्यावर त्यात 200 ते 250 ग्रॅम जिवाणू संवर्धन मिसळावे. बियाण्यास सर्वप्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे( अझोस्पिरिलम) व स्फुरद विरघळवणारे पीएसबी यांचे मिश्रण करून बियाण्यास लावावे. 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर , ताडपत्रीवर किंवा मोठ्या घमेल्यात पसरवून त्यावर तयार केलेल्या संवर्धनाचे मिश्रण शिंपडल्यास व हलक्या हाताने सर्व बियाण्यास चोळल्यास प्रत्येक बियाण्यास सारखा थर लागतो. त्यानंतर बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे 24 तासाच्या आत पेरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ. उषा डोंगरवार व डॉ. प्रवीण राठोड यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies