Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्याला आतापर्यंत 38 कोटीचा निधी : जिल्हाधिकारी खेमनार

अधिकचा 25 कोटीचा निधी डीपीडीसीमध्ये आरक्षित करणार

Ø  आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करणार

Ø  अन्नधान्याच्या वाटपाचा निधी आता आरोग्य यंत्रणेसाठी

Ø  जिल्हयासाठी 25 रुग्ण वाहिकांची खरेदी करणार

Ø  अन्य जिल्हयाच्या तुलनेत भरीव मदत

चंद्रपूर,दि.15 मे : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू कोविड-19 रोगराई नियंत्रणाकरिता चंद्रपूर जिल्ह्याला विदर्भातील अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. जवळपास विविध घटकातून अडतीस कोटींवर निधी मिळाला आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी व सध्याच्या परिस्थितीत विविध उपाययोजनांसाठी याचा खर्च होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार  यांनी केले आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधीचे नियोजन करण्यात आले आहे. आता जिल्ह्यासाठी 38 कोटी 12 लक्ष रुपयांचे नियोजन करण्यात आलेले असून पुढील टप्प्यासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 25 कोटी आरक्षित करण्याच्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचना आहेत.या सर्व निधीचा जिल्हा मुख्यालय ते तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणा या निधीचा कोरोना प्रतिबंधासाठी वापर करीत आहे.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून आतापर्यंत 3 कोटी रुपये, जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्याकडून 11.43 कोटी, जिल्हा वार्षिक योजना  22.89 कोटी, आमदार व खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत  80 लक्ष  असे आतापर्यंत  38.12 कोटी नियोजित केले आहे.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर या यंत्रणेला कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी कोविड तपासणी प्रयोगशाळा स्थापित करण्याकरिता तर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे नवनिर्मित इमारतीमध्ये कोरोना वार्ड तयार करण्याकरिता 2 कोटी 43 लक्ष रुपये वितरित करण्यात आले. ही कामे प्रगतीपथावर असून प्रयोगशाळेत विदेशातून यंत्रसामुग्री लवकरच येणार आहे. पायाभूत सुविधांची व्यवस्था झाली आहे.तसेच कोरोना वार्ड देखील तयार झाला आहे.  महिनाअखेर जिल्ह्यामध्येच स्वॅब तपासणी सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, जिल्हा खनिज निधी संदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार यांनी सूचवल्यानुसार सध्या मजुरांचे सुरू असणारे स्थलांतरण व जिल्ह्यातील पुरवठा विभागामार्फत होत असलेले वितरण लक्षात घेता ,जीवनावश्यक वस्तूंच्या किट वितरणाचा कार्यक्रम स्थगित करून हा निधी सध्या आवश्यक असणाऱ्या ॲम्बुलन्स खरेदीसाठी वळता करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व सर्वव्यापी होईल.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात येता जिल्ह्यातील यंत्रणेसोबत तालुकास्तरावरील यंत्रणादेखील बळकट करणे आवश्यक आहे. यासाठी 6 कोटी खर्च करून अद्ययावत ॲम्बुलन्स घेतल्या जाणार आहे यातील 3 मेडिकल कॉलेजसाठी , 20 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी, 12 उपजिल्हा रुग्णालय यांसाठी रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहे ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला 22 कोटी 89 लक्ष रुपये निधीचे वाटप करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परीषद आरोग्य विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे,साधन सामुग्री व यंत्रसामुग्री खरेदी, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांना ग्रामीण रुग्णालयातील औषधे,साधन सामुग्री व यंत्रसामुग्री खरेदी, अधिष्ठाता,शासकिय वैदयकीय महाविदयालय,चंद्रपूर यांना हॉस्पीटलची औषधे,साधन सामुग्री व यंत्रसामुग्री खरेदी, सॅनिटायझर व अन्य आरोग्य उपाययोजना यासाठी विविध नगरपंचायती, नगर पालिका यांना जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर विकास,अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्यविषयक उपाय योजना साठी निधी देण्यात आला आहे.

आमदार, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम या माध्यमातून ही 80 लक्ष रूपयांचा निधी कोरोना  उपाययोजनांमध्ये वापरण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies